नंदुरबार : शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या गरिब व मागास वर्गातील विद्यार्थ्यांनाही खाजगी अनुदानित, विनाअनुदानीत शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेता यावे यासाठी शासनाकडून संबंधित शाळेत अशा विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के कोटा रिक्त ठेवण्यात येत असतो़ परंतु जिल्ह्यात याबाबत जनजागृृतीबाबत निरुत्साह असल्याने साहजिकच वर्षानुवर्षे आरटीईच्या जागा रिक्तच राहत असल्याची स्थिती आहे़साधारणत: २०१३ पासून २५ टक्के कोट्यांतर्गत आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली़ याला इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी नंदुरबारात मात्र २०१३ ते २०१५ दरम्यान या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे़ त्यामुळेच की काय शिक्षण विभागाकडेसुध्दा २०१३ ते २०१५ दरम्यान जिल्ह्याला आरटीईअंतर्गत किती जागांचा कोटा देण्यात आला होता, याबाबत माहिती नाहीये़आरटीई कशाशी खातात हेच येथील पालकांना माहिती नसल्याने साहजिकच यांतर्गत प्रवेश घेण्यासाठी उदासिनता दिसून आली़ साधारणत: २०१७-२०१८ पासून आरटीईबाबत थोडीफार माहिती मिळाल्यानंतर काही पालकांकडून यासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले होते़ २०१७-२०१८ मध्ये जिल्ह्यात एकूण ४० शाळांमार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यासाठी जिल्ह्याला ४५२ जागांचा कोटा ठरविण्यात आला होेता़ परंतु यापैकी केवळ ११२ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता़ त्यामुळे ३४० जागा रिक्त राहिल्या होत्या़ २०१८-२०१९ मध्ये तीन शाळांमध्ये वाढ करण्यात आली होेती़ एकूण ४३ शाळांमार्फत ४५३ जागांसाठी आरटीई प्रवेश परीक्षा राबविण्यात आली़ परंतु त्याही वेळी केवळ १३७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता़ त्या वेळी तब्बल ३१६ आरटीई जागा रिक्त झालेल्या होत्या़यंदाही रिक्त जागांची डोकेदुखीदरम्यान, या वर्षीदेखील आरटीईअंतर्गत जास्तीत जास्त प्रवेश करवून घेण्यासाठी शिक्षण विभागाला चांगलीच कंबर कसावी लागत आहे़ परंतु तरीदेखील पालकांचा याला प्रतिसाद मिळत नसल्याने या वर्षीसुध्दा आरटीईचा कोटा रिक्तच राहतोय की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे़ यंदा जिल्ह्यातील एकूण ४७ शाळांमार्फत ४७० जागांसाठी आरटीई प्रवेश परीक्षा राबविण्यात येत आहे़ यासाठी जिल्ह्यातून एकूण ५७३ अर्ज दाखल करण्यात आलेले आहे़ ८ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या आॅनलाईन सोडतीमध्ये जिल्ह्यातील एकूण १४० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले होते़ परंतु त्यापैकी आतापर्यंत केवळ ७८ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली आहे़ अद्याप दुसरी व तिसरी प्रवेश फेरी बाकी आहे़ परंतु पालकांचा पहिल्या प्रवेश फेरीला मिळालेला अल्प प्रतिसाद बघता पुढील फेऱ्यांमध्येही समाधानकारक प्रवेश होतील याची आशा धुसरच आहे़ त्यामुळे यंदाही तीनशेहून अधिक जागाचा कोटा रिक्तच राहणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे़शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पालकांकडून प्रवेश अर्ज सादर करताना शाळांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येत असतो़ परंतु प्रत्यक्षात त्यांना दुसरीच शाळा मिळाल्यावर ते प्रसंगी पैसे भरुन मनपसंत शाळेत प्रवेश घेतात़
दरवर्षी आरटीईचा कोटा राहतोय रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:52 IST