याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, जमिनीच्या उदरातून निघालेले पीक अपुऱ्या पावसामुळे कोमेजली आहेत. त्यामुळे शेतीतील पिकांची स्थिती नाजूकच झाली आहे. अशीच अवस्था बागायत शेतकऱ्यांचीही असल्याने विहिरीतील पाणी तळाला गेले आहे. साहजिकच शेतकरी चिंतित सापडलेला आहे.
जिल्ह्यात एकदाही जोरदार पाऊस झालेला नाही. नद्या, नाले, तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे विहिरींचा व बोरवेलचा पाण्याचा स्त्रोत आटत चालला आहे. त्यामुळे जिरायत आणि बागायत शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. एकीकडे कोरोनाचे सावट त्यात उद्योग व्यवसायांना चालना मिळाली नाही. त्यात बँकेचे व सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील लघु-मध्यम प्रकल्प, कोल्हापुरी केटीवेअरमध्ये अत्यल्प पाणीसाठा तर काही कोरडेठाक आहेत. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने भरडला जात आहे. मागील तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत असून, आकाशी ढगांची गर्दी होत आहे. मात्र, जिल्ह्यात पिकांना पोषक असा पाऊस नाही. गेल्या आठवड्यात कडक उन्हामुळे पिके अधिक कोमेजू लागली आहेत. पिकांची अवस्था अत्यंत नाजूक झाली आहे. जिरायत आणि बागायत शेतीत जी काही पिके उभी आहेत. अपुऱ्या पावसाअभावी जेमतेम तग धरत उभी असलेली पिके रोगराईच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यामुळे शेतकरी-शेतमजूर त्याचबरोबर सर्वच पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. एकीकडे पावसामुळे हैराण झालेला शेतकरी तर दुसरीकडे काही ठिकाणी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल होत असताना दिसते आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता, आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपल्यामार्फत दखल घेऊन नंदुरबार जिल्हा दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर सरचिटणीस प्रवीणसिंह राजपूत, शरद जाधव, राजेंद्र राजपूत, तळोदा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या सह्या आहेत.