n लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : श्री विष्णू नारायण पूरम तीर्थ देशातील एकमेव तीर्थक्षेत्र ठरणार असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शहादा तालुक्याचे नाव चमकणार आहे. या तीर्थक्षेत्राच्या पायाभरणीनिमित्त अधिष्ठान पूजनाचा मान मला मिळाला ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केले.तालुक्यातील मोहिदेतर्फे हवेली परिसरात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळानजीक श्रीश्रीनारायणपूरम येथे भारतातील पद्मनाभम श्रीनारायणांचे श्री विष्णू नारायण पूरम मंदिराची पायाभरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते रविवारी सकाळी दहा वाजता श्री नारायण भक्ती पंथाचे स्वामी श्री लोकेशानंद महाराज यांच्या नेतृत्वाखाली भक्तिमय वातावरणात करण्यात आली. गृहमंत्री देशमुख यांचे तीर्थक्षेत्री आगमन झाल्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांना मंदिर परिसरात सुरू असलेल्या कार्याची माहिती श्री लोकेशानंद महाराज यांनी दिली. मंगल वाद्यासोबत सनई-चौघड्यात भक्तीमय वातावरणात सुमारे एक तास चाललेल्या कार्यक्रमात पायाभरणीनिमित्त अधिष्ठान यज्ञ संपन्न झाला. श्री नारायण भक्ती पंथामार्फत मोहिदेतर्फे हवेली शिवारातील खेतिया रस्त्यावरील श्रीश्रीनारायणपूरम येथे भारतातील दुर्लभ आणि दिव्य भव्य मंदिर या परिसरात निर्माण केले जाणार आहे. चार एकर क्षेत्रात ३६ हजार स्केअरफूट जागेत केरळ येथे असलेल्या पद्मनाभम श्रीनारायण मंदिरासारखी ११ फूट उंचीची शेषशाही विष्णू भगवानची अष्टधातूची मूर्ती या मंदिरामधे स्थापित करण्यात येणार आहे. संतश्री लोकेशानंदजी महाराजांच्या संकल्पनेतून निर्माण होणारे भारतातले हे पहिले व एकमेव मंदिर राहणार असून यामुळे परिसराला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. देशभरातून या स्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या भविष्यात मोठी असणार आहे.आजच्या पूजेला कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंग पाळून संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
विष्णूधाममुळे शहादा तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:35 IST