नंदुरबार : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत संकलित केलले १० हजारपैकी साडेनऊ हजार पाणीनमुने तपासण्यात आले होते़ यातून जिल्ह्यातील ९७ टक्के स्त्रोतांचे पाणी हे पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी नमुने तपासणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे़जिल्ह्यातील पालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणी योजना, हातपंप, विहिरी, अधिग्रहीत विहिरी आणि कूपनलिका यांचे पिण्यायोग्य आहे किंवा कसे, याबाबतची चाचपणी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येते़ यांतर्गत नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर आणि तळोदा येथील प्रयोगशाळेत मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर अशा दोन टप्प्यात पाणी नमुने संकलित करुन करुन त्यांची तपासणी केली होती़ तब्बल १० हजार अशा या नमुन्यांची चाचणी करुन त्यातील २९२ नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे दिला होता़ यानुसार जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरु केल्याची माहिती आहे़पाणी तपासणीचा हा उपक्रम केवळ शासनापुरताच मर्यादित न ठेवता त्यात नागरिकांना सामावून घेण्यात आले आहे़ खाजगी कूपनलिका, पाणी व्यावसायिक, हॉटेल्स यासह इतर व्यावसायिक उपक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी जिल्हा प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे़ यासाठी माफक असे शुल्क भरुन जलनमुन्याची पडताळणी होणार असल्याने पाण्याची स्थिती समजून येण्यास मदत होणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिले आहे़ भूजल सर्वेक्षण विभागाकडून २०१८-१९ या वर्षात मान्सूनपूर्व हंगामात एकूण ४ हजार ८६२ पाणी नमुन्यांची तपासणी केली होती़ यापैकी ४ हजार ७७१ नमुने हे योग्य तर ९१ नमुने हे पिण्यासाठी अयोग्य होते़ अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार १४८, धडगाव १ हजार ७४, नंदुरबार ४११, नवापूर १ हजार ९५, शहादा ५७७ तर तळोदा तालुक्यातून ५५७ नमुने तपासण्यात आले होते़ यात अक्कलकुवा ७, नंदुरबार ४, नवापूर १२, शहादा ४४ तर तळोदा तालुक्यातील २४ जलस्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य होते़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यातील सर्वच नमुने सकारात्मक होते़मान्सूननंतर प्रयोगशाळेत प्राप्त झालेल्या ५ हजार १३८ जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती़ यात अक्कलकुवा १ हजार ९६, धडगाव १ हजार १, नंदुरबार ४९२, नवापूर १ हजार ३३३, शहादा ५४१ तर तळोदा तालुक्यातून ५६५ स्त्रोत पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले होते़ यात अक्कलकुवा १३, नंदुरबार ४९, नवापूर ३२, शहादा ७ तर तळोदा तालुक्यात सर्वाधिक ११० नमुने हे पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले होते़ पहिल्या हंगामात ९१ तर दुसऱ्या हंगामात २०१ असे एकूण २९२ जलस्त्रोत धोकेदायक आहेत़ विशेष म्हणजे धडगाव तालुक्यात एकही जलस्त्रोत दूषित नसल्याची माहिती देण्यात आली आहे़
जिल्ह्यातील ९ हजार स्त्रोतांचे पाणी पिण्यायोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:11 IST