लॉकडाऊनमध्ये पुरुष मंडळी घरीच असल्याने यावेळी वरील कामांसाठी महिलांना पुरुषांचीही मदत मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये काही महिलांनी पावसाळापूर्व कामे पूर्ण केली आहेत. मे महिन्याचा उन्हाळा कडक असतो. साहजिकच या महिन्यात पापड, खारोड्या, कुरडया सुकविण्यासाठी चांगले ऊन असते. तसेच मसाला कुटण्याआधी लाल मिरची उन्हातच सुकवून, मग ती कुटण्यासाठी मसाला गिरणीत दिला जातो. त्या व्यतिरिक्त आदिवासी बांधव पावसाळ्यात सरपणाची सोय व्हावी यासाठी रानात जाऊन सरपण गोळा करून आणत आहेत. शेतीच्या मशागतीलाही वेग आला आहे.
लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नसल्याने अद्याप शेतीच्या मशागतीची कामे थंडावली आहेत. यंदा मजुरांची वाणवा असल्याने शेतीच्या मशागतीसाठी मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. आदिवासी बांधव दरवर्षी उन्हाळ्यात रानातील रानमेवा बाजारात विकण्यासाठी आणतात. परंतु लॉकडाऊनमध्ये यंदा सर्वत्र पाणी फेरले गेले आहे.
कोरोनाने हिरावून घेतली संधी
यंदा ऐन व्यवसायाच्या हंगामात रानमेवा बाजारात कोरोनामुळे येऊ न शकल्याने कित्येक आदिवासी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मासेमारी करणाऱ्यांनाही फटका बसला आहे. तसेच आठवडे बाजारावर अवलंबून असलेल्या लहान व्यापाऱ्यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एप्रिल व मे महिन्यात व्यवसाय करणाऱ्यांना अनेक संधी असतात. मात्र या संधी कोरोनाने हिरावून घेतल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.