कोरोना कालावधी
कोरोना संक्रमणाच्या दीड वर्षाच्या कालावधीपैकी बराचसा कालावधी संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती. या कालावधीत तेव्हाच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची परवानगी शासनाने दिली होती. याच कालावधीत खुल्या बाजारात विविध खाद्य पदार्थांसाठी नागरिकांची मागणी मोठ्या प्रमाणात होती तर त्या वस्तुंचा पुरवठा कमी प्रमाणात होता. अशा परिस्थितीत काही ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी शासनाचा अन्न प्रशासन विभाग देखरेख ठेवतो. या विभागामार्फत वेळोवेळी बाजारातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. तपासणी अहवाल आल्यानंतर भेसळखोरांवर कारवाई केली जाते; मात्र नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अन्न प्रशासन विभागाचे स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात नाही. पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही. परिणामी, भेसळखोरांवर कायद्याचा कुठलाही धाक नसल्याने जिल्ह्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री खुलेआम होत आहे.
खरेदी करताना घ्यावयाची काळजी
सर्वांनी आय.एस.आय. मार्क किंवा एगमार्क असलेले पदार्थ खरेदी करावेत. अन्न भेसळ ओळखण्याच्या विविध पद्धतीचे ज्ञान अवगत करणे व अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची माहिती करून त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थांमधील भेसळीचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने खरेदी करताना सर्व नागरिकांमध्ये अन्नभेसळीबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा प्रत्येक व्यक्तीपर्यंत व महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी लोकचळवळ निर्माण करणे काळाची गरज आहे. कायदा व कायद्याच्या पळवाटा यामुळे अन्नभेसळ करणाऱ्यास सोडून देण्याची प्रवृत्ती यामुळे भेसळखोरांना मोकळे रान मिळते. परिणामी, कायदा असतानाही त्याचा धाक त्यांच्यावर राहत नाही.
सणासुदीच्या काळात
सण- उत्सवांच्या काळात बाजारात विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने भेसळीची शक्यता सर्वाधिक असते. भेसळयुक्त खाद्य पदार्थांमुळे तसेच अन्न भेसळीचा मानवी आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत असल्याने दृष्टी कमजोर होणे, दात तुटणे, त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, हाडे कमजोर होणे, लिव्हर, किडणी खराब होणे, आतड्यावर सुज येणे अशा सारखे आजार होऊन मानवी आयुष्याची हानी होते. अखाद्य रंगाच्या वापरामुळे जुलाब, उलट्या होऊ शकते, पचनसंस्थेचे विकार होणे, खनिज पदार्थाच्या सेवनाने आतड्यांचे रोग होणे, अशा विविध व्याधी होत असल्याने सणासुदीच्या काळात विशेष खबरदारी बाळगली पाहिजे.