तळोदा तालुक्यातील लक्कडकोट गावातील काही रहिवाशांनी गावात जागे अभावी काही वर्षांपूर्वी शेतातच घरे बांधली होती. मात्र कालांतराने तेथून त्यांनी जवळच असलेल्या धरणा जवळील सपाटीवर असलेल्या जागेवर कच्ची घरे बांधली. जवळपास सात ते आठ वर्षे झालीत. सदर वसाहत खर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीत येते. त्यामुळे पंचायतीत त्यांना ठिक ठिकाणी चार हात पंप बसवून दिले आहेत. तथापि तेथील पाण्याची पातळी २०० फुटांपेक्षा अधिक खोलवर गेल्याने त्यातील दोन हातपंप निकामी ठरले आहेत. साहजिकच रहिवाशांना दोन हात पंपांचा सहारा घ्यावा लागत आहे. त्यातही एक जेमतेमच चालत असतो. त्यामुळे एकावरच भार चालू आहे. तोही वसाहती पासून ८०० मिटर लांब अंतरावर आहे. तेथूनच गावकऱ्यांना पायपीट करत पाणी आणावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली आहे.
याशिवाय शेत शिवारातील कृषी पंपावर पाणी आणण्यासाठी जावे लागत असल्याचे गावकरी सांगतात. संपूर्ण दिवस पाणी आणण्यासाठी जात असल्याने मोल मजुरीस देखील जाता येत नाही. आधीच गावात विजेची सुविधा नाही. त्यामुळे गावात नळ पाणीपुरवठ्याची सुविधा नाही. साहजिकच हात पंपाशिवाय आम्हाला पर्याय नाही. ग्राम पंचायतीने तातडीने निदान एक-दोन हातपंप बसवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावठाणचा प्रस्तावही प्रलंबितच
या नवीन वसाहतीच्या ठिकाणी गावठाण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी शासनास प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी गावकऱ्यांना वीज, रस्ते, पाणी, शिक्षण या सारख्या मूलभूत सुविधांपासून स्वातंत्र्याचा ७३ वर्षानंतरही वंचितच राहावे लागत आहे. वसाहतीत ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. तरीही महसूल गाव तर सोडा साधे गावठाण देखील मंजूर केले जात नाही. याबाबत गावकऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे. अगदी लोकप्रतिनिधीही निवडणुकीच्या वेळी येवून गेले होते. त्यांनी तातडीने नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते अद्याप हवेतच विरले आहे. त्यांनीही साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या वसाहतीत चार हातपंप बसविले असून, त्यातील दोघांची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने बंद आहेत. इतर दोघांना चांगले पाणी आहे. तरीही एक हातपंप बसविण्याचे नियोजन आहे. लवकरच त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. - बी.के. नाईक, ग्रामसेवक, खर्डी बुद्रुक ग्रामपंचायत.
३०० लोकवस्तीसाठी केवळ चार हातपंप आहेत. यातील दोन्ही हात पंप पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे निकामी झाली आहेत. जेमतेम दोन सुरू आहेत. त्यातील एक वसाहती पासून ७०० मिटर लांब आहे. त्यावरच गर्दी होत असते. हंडाभर पाणी आणण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यामुळे पाण्याचा अतोनात त्रास असून, पाण्याची सोय करून मिळावी. - सुनीता लालासिंग पाडवी, ग्रामस्थ, नवीन वसाहत, लक्कडकोट