लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाची इमारत नवी असल्यामुळे इलेक्ट्रीक फिटिंगची अवस्था ब-यापैकी आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक ॲाडीट करण्याची गरज भासली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. असे असले तरी दर वर्षी इलेक्ट्रीक ऑडीट करणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील काही कक्षांमध्ये वायरी व बटन बॅाक्स उघडे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अग्नीरोधक उपकरण देखील मोजक्याच ठिकाणी असल्याचे चित्र आहे. भंडारा येथे जिल्हा रुग्णालयातील आगीत १० अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट करण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात देखील त्यासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रतिनिधीनीने केेलेल्या पहाणीत मात्र अनेक ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पाहणीत काय आढळले ?निर्जंतुकीकरण विभागातील इलेक्ट्रीक उपकरणे उघडी आहेत. वायरी लोंबकळल्या आहेत. जुन्या इमारतीत अनेक ठिकाणी अशी समस्या आहे. काही वॅार्डात बटन बॅाक्स देखील खराब झाले असून ते उघडे आहेत. याउलट नवीन इमारतीमंधील वायरींग ही सुस्थित आहे. फ्यूजपेट्या आणि बटन बॅाक्स भिंतीच्या आतमध्ये लावण्यात आलेले आहेत.
‘कालाकल्प’चा दोन वेळा पुरस्कारनंदुरबार जिल्हा रुग्णालयाला सलग दोन वर्ष कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी असलेल्या अटीत अग्नीरोधक यंत्र, इलेक्ट्रीक सुरक्षीतता यालाही गुण असतात. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट केलेले नाही हे मात्र वास्तव आहे.
२१ जानेवारीपर्यंत ऑडीटजिल्हा रुग्णालयाच्या सर्व इमारती या नव्या आहेत. तेथे ईलेक्ट्रीक फिटींग देखील चांगल्या स्थितीत आहे. कायाकल्प पुरस्काराच्या अटीअंतर्गत त्याचा दरवर्षी आढावा घेतला जातो. आता २१ जानेवारीपर्यंत ॲाडीट देखील करण्यात येणार आहे. -डॅा.के.डी.सातपुते,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक.
दुर्गम भागातून येथे उपचारासाठी आलो आहे. सुविधा चांगल्या असल्या तरी त्यात सातत्य हवे. स्वच्छता वेळेवर व्हावी, नादुरूस्त पंखे दुरूस्त करावे. सद्या हिवाळा असल्यामुळे पंख्याची गरज नसली तरी डास व मच्छरांपासून बचावासाठी पंखा लावावा लागतो. -एक महिला रुग्ण, धडगाव तालुका.
जिल्हा रुग्णालयाच्या इमारती नव्या असल्यामुळे सुविधा ब-या आहेत. परंतु स्वच्छतागृहे फारच खराब आहेत. पिण्याचे स्वच्छ पाणी हवे. नियमित पंखे सुरू राहू द्यावे. डास व मच्छरांचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्रास होतो. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. - तुकाराम पावरा, रुग्ण.