गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाच्या परवानगीने सिंचन प्रकल्पातील गाळ स्वखर्चाने काढला होता. यंदा अशी परवानगी देण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव त्याकडे दुर्लक्ष करावे लागल्याचे काहींनी सांगितले. वास्तविक दरवषी शेतकरी धरण अथवा तलावातील गाळ काढून आपल्या शेतात टाकायचे नियोजन करीत असतात. मात्र याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घातले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजनदेखील कोलमडले. वास्तविक पाचही प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याचा पुरेसा साठा होण्याबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. कारण गाळामुळे प्रकल्पांची खोलीच कमी झाली आहे. पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर आतापासूनच शेतकऱ्यांना रब्बीची चिंता निर्माण झाली आहे. यंदा तर हवामान विभागाने शंभर टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मात्र यंत्रणांच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली आहे. निदान पूर्ण क्षमतेने पावसाळा सुरू होण्यास अजून, आठ-१० दिवसांच्या कालावधी शिल्लक आहे. तेव्हा दोन्ही यंत्रणांनी युद्ध पातळीवर प्रकल्पांमधील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
यंदाही दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष
तालुक्यातील चारही लघुसिंचन प्रकल्प जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कुठे सांडवे ना मोठमोठे तडे गेले आहेत तर कुठे भराव खचले आहेत. त्यामुळे सर्वांनाच गळती लागली आहे. थेट उन्हाळ्याच्या आधी म्हणजे मार्च महिन्याचा शेवटपर्यंत गळती लागली होती. अक्षरशः प्रचंड पाणी वाया जात होते. पाण्याच्या गळतीमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागले होते, अशी वस्तुस्थिती असताना सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणा नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दरवर्षी यंत्रणा केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच करत नाही. त्यामुळे यंदाही प्रकल्पांची डागडुजी अथवा दुरुस्ती रखडली आहे.
लघुसिंचन प्रकल्पाचा गाळ काढणे अथवा दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष घालत नाही. आम्ही शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात मागणी करीत असतो. केवळ पोकळ आश्वासन दिले जात असते. गळतीमुळे तर माझे नेहमीच नुकसान होत असते. मात्र मुकाट्याने सहन करावे लागत आहे. - भानुदास मराठे, शेतकरी, रांझणी, ता. तळोदा.