केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त जिल्ह्यात आल्या असता त्यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, प्रकाशा हे गाव तापी नदीकाठावर वसले आहे. येथे तापी नदीवर बॅरेज मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे. उपसा जलसिंचन योजना बंद असल्याने शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होत नसल्याने उपसा योजना कार्यान्वित कराव्यात. प्रकाशा ते सारंगखेडा या २२ किलोमीटर अंतरापर्यंत पाणी थांबते; परंतु मच्छीमारांना असंख्य अडचणी येतात. बॅरेजमुळे मासेमारीचा नैसर्गिक स्रोत कमी झाला आहे. पाणी थांबल्यामुळे मासळीचा परतीचा प्रवास थांबतो म्हणून मासे हाती लागत नाही. तापी काठावरील गावांनी नोंदणीकृत मच्छीमार सोसायटीही स्थापन केली आहे. मात्र, शासनाकडून मासेमारी करणाऱ्यांना कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. या जलाशयात वेळोवेळी मत्स्यबीज व कोळंबी बीज मत्स्य विभागाकडून सोडण्यात यावे, मच्छीमारांना अत्याधुनिक मत्स्य नौका, अनुदानातून इंधन, मासेमारीची जाळी, जीवन रक्षक किट, मत्स्यशोध सुविधा, विमा संरक्षण मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष पंडित धनराळे व प्रकाशा येथील मच्छीमारांनी हे निवेदन दिले.
मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST