कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष सीमा वळवी, खासदार डॉ. हीना गावित, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि. प. समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण बावा, दिलीप नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश वळवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. पाडवी म्हणाले की, अलीकडच्या काळात आरोग्य सुविधांचा विकास वेगाने होत आहे. नागरिकांनी अशा आधुनिक सुविधांचा उपयोग करून घ्यावा. आदिवासी विकास विभागामार्फत आरोग्य सुविधांसाठी १७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आकांक्षित जिल्हा म्हणून २५ कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती राज्यात उत्तम अशा आहेत. ग्रामीण भागात आरोग्याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना संदर्भात नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कोरोना काळात सर्व आरोग्य कर्मचारी चांगले काम करीत आहेत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोरोना नियंत्रणात त्यांना सहकार्य करावे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
जि. प. अध्यक्ष सीमा वळवी म्हणाल्या की, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे नागरिकांना २४ तास आरोग्य सुविधा मिळेल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रातील सुविधांचा नागरिकांसाठी क्षमतेने उपयोग करावा. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे कोरोना संसर्ग नियंत्रण शक्य झाले. कोरोना लसीकरणासाठी जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रमाणात वाढ होत असून, कमी लसीकरण झालेल्या गावात लसीकरण वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या की, नूतन इमारतीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण करून घ्यावे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गरजू व्यक्तीवर मोफत उपचार होत असल्याने पात्र व्यक्तींनी त्यासाठी आवश्यक कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.