लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर भारतात दिवसेंदिवस पपईच्या दरात वाढ होत आहे. परंतु त्यामानाने जिल्ह्यातील शेतकऱ्याना दर कमी मिळत आहे. गुरूवारपासून ११ रूपये २५ पैसे दरानेच पपईची तोड व्यापाऱ्यांना करू दयावी, अन्यथा तोड बंद ठेवून शेतकऱ्यानी सहकार्य करावे, असे बैठकीत सर्वानुमते ठरले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपई दरासंबंधी पपई उत्पादक शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात इतर राज्यातील पपई दराविषयी ऑनलाईन मार्केटचे दर तपासून पाहिले असता, सर्व मार्केटमध्ये २० रूपयांच्यावर दर असल्याने सर्वानुमते बैठकीत पपईचा दर हा ११ रुपये २५ पैसे ठरविण्यात आले असून, गुरूवारपासून जे व्यापारी वरील दराने माल काढतील त्यांनाच पपई तोड करू द्यावी, अन्यथा तोड बंद ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. या वेळी बैठकीत शंकर पाटील, संजय पाटील, विशाल पाटील, राकेश पाटील, योगेश पाटील आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांनी आपले मते व्यक्त केली. दरम्यान व्यापाऱ्यांची पाच दिवस अगोदर परस्पर बैठक झाली होती. त्यात त्यांनी स्वतः शेतकऱ्याना विश्वासात न घेता आठ रूपये दर परस्पर ठरवला असल्याचे समजते. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर मेसेजही व्हायरल केला होता. इतर राज्यात पपईचे दर २० रूपयांच्यावर असूनही व्यापारी मात्र शेतकऱ्यांकडून अल्प दरात पपईची खरेदी करीत आहेत. त्यातून व्यापाऱ्यांना भरघोस नफा मिळत आहे. मात्र शेतकरी देशोधडीला लागत आहे. त्यामुळे पपईचा दर निश्चित करण्यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी बैठक बोलावली त्यात मात्र व्यापारी उपस्थित नव्हते.
पपईची तोड ११ रूपये २५ पैसे प्रमाणे करण्याचा शहाद्यात निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:35 IST