लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घरगुती वापराच्या लहान सिलिंडरला कसाई मोहल्ला भागात लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. आग विझविण्याचा प्रयत्न करणारे मुलासह दोनजण जखमी झाले. पालिकेच्या बंबाने व परिसरातील नागरिकांनी मदत कार्य केल्याने लागलीच आग आटोक्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी कसाई मोहल्ला भागातील बीफ मार्केट रस्त्यावरील शेख अशपाक शेख अब्दुल यांच्या घरात ही घटना घडली. शेख यांच्या घरातील घरगुती वापराचे लहान सिलिंडरने अचानक पेट घेतला. ती आग विझविण्यासाठी शेख अब्दुल व लहान मुलाने धाव घेतली. परंतु आग भडकल्याने ते जखमी झाले. आगीने घरालाही आपल्या लपेट्यात घेतले. त्यामुळे घरगुती सामान देखील जळून खाक झाला. तातडीने पालिकेच्या अग्नीशन बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यत परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. आजूबाजूची घरे ही कच्ची होती. सुदैवाने आग भडकली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.याबाबत रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते. पंचनामा करून गरीब कुंटूबांला आर्थिक मदत करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
सिलिंडरने घेतला पेट, घर खाक, दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 11:24 IST