जिल्हा रुग्णालयासह नंदुरबार शहरातील जेपीएन रुग्णालय, शहादा, नवापूर, तळोदा, म्हसावद, अक्कलकुवा आणि धडगाव याठिकाणी शासकीय कर्मचारी व ज्येष्ठांच्या लसीकरणाची सोय आहे. याठिकाणी मोफत लसीकरण होत आहे. दरम्यान शासनाच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यात चार खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. यानुसार नंदुरबार शहरात एक तर शहादा येथे दोन ठिकाणी लसीकरण होत आहे. खाजगी ठिकाणी माफक अशी फी घेवून होत असलेल्या या लसीकरणाला ज्येष्ठांकडून गर्दी करण्यात येत असल्याचे दिसून आहे. यातून या रुग्णालयांमध्ये वर्दळ दिसून येत आहे. दरम्यान शासकीय केंद्रामध्ये लस घेण्यासाठी वर्दळ असल्याचे दुपारी दिसून आले.
नंदुरबार आणि शहादा याठिकाणी होत असलेल्या लसीकरणासाठी वयाची ६० वर्ष पार केलेल्या वृद्धांचा सर्वाधिक सहभाग आहे. त्यांच्याकडून नोंदण्या करुन हजेरी लावली जात आहे. काहीजण थेट रुग्णालयात येवून नोंदणी करुन घेत आहेत. यापूर्वी शासकीय कर्मचा-यांना लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तब्बल १८ हजारपेक्षा कर्मचारींना आतापर्यंत लस दिली गेली आहे. यात १८ वर्षावरील कर्मचारींचा समोवश आहे. परंतू लसीकरणाच्या वेगातून ज्येष्ठांचा हुरुप अधिक आहे. पहिल्या ९ दिवसात लसीकरणासाठी ३ हजार २९५ ज्येष्ठांच्या नोंदण्या झाल्या असून ६०० पेक्षा अधिक ज्येष्ठांचे लसीकरण मंगळवारी सर्व ९ केंद्रांवर झाले.
जिल्ह्यातील तीन खाजगी रुग्णालयात दरदिवशी किमान १०० किंवा त्यापेक्षा अधिक ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. मंगळवारी तिन्ही खाजगी रुग्णालयात २८६ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
खाजगी दवाखान्यात लस भेटत असल्याने समाधान आहे. मी तेथे जावून लस घेतली. लसीकरणानंतर काहीही त्रास झालेला नाही. इतरांनीही लसीकरण करुन घेतल्यास कोरोनापासून मुक्त होता येईल.
-रामदास पाटील,नंदुरबार,
मुलांकडून लसीकरणासाठी सांगितले गेले होते. प्रारंभी भिती होती. परंतू लस देणा-या डाॅक्टरांनी योग्य ती काळजी घेण्याचे सूचित केले होते. यानुसार लस घेतली. आता बरे वाटत आहे. महिलांनी लस घेण्यासाठी पुढे यावे.
-वत्सलाबाई पाटील,शहादा.
महिलांचा सहभाग मोठा
n सोमवारी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ९ सेंटर्समध्ये केवळ महिलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. यावेळी दिवसभरात ६५० पेक्षा अधिक ज्येष्ठ महिलांना लस देण्यात आली. मंगळवारीही ३०० पेक्षा अधिक महिलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.