यावर्षी सुरूवातीला मिरचीला अपेक्षित भाव मिळाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलच्या शेवटी विकतचे पाणी घेऊन व मोठा खर्च करुन मिरची लागवडीचे नियोजन केले. सुरुवातीला बाजारात मिरचीची आवक कमी असल्याने क्विंटलला चार ते पाच हजारापर्यंत भाव मिळाला. मात्र जसजशी मिरचीची आवक वाढली तसतसे मिरचीचे भाव उतरतच गेले. सध्या हे भाव ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटल पोहोचले आहे. परिसरात सध्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे मिरची पिकावर बुरशीजन्य रोग पडला असल्याने शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करुन मिरची वाचविण्याचे प्रयत्न केले. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मरावे की जगावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अचानकच दीड हजार रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले आहे. मिरची लागवडीपासून ते आतापर्यंत भरपूर असा खर्च व विविध रोगांचा सामना करावा लागतो. परंतु अचानकच मिरची पिकाची आवक वाढल्याने व भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च व मजुरांचे पैसे निघत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. पूर्वहंगामी लावलेल्या मिरचीला सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असल्याने लागवड केली. त्यात काही शेतकऱ्यांकडे पाणी नसल्याने टँकरद्वारे विकत पाणी घेऊन मिरची पिकाला पाऊस पडेपर्यंत कसेबसे जगवले. त्यामध्ये आठ दिवसापूर्वी १५ ते २० दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. परंतु इतर राज्यात मिरची पिकाची आवक वाढल्याने राज्यातील व्यापारीही मिरचीची कमी भावाने खरेदी करीत आहेत. त्याचाच परिणाम दोडाईचा, नंदुरबार येथील मिरची मार्केटमध्ये जाणवू लागला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली असल्यामुळे येथील मिरची मार्केटमध्ये आवक वाढली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये १६ हजार रोपांची लागवड केली आहे. आत्तापर्यंत रासायनिक खते, कीटकनाशक औषधे असा भरपूर खर्च मिरची पिकावर केलेला आहे. आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री केली. परंतु भाव घसरल्याने खर्चही निघत नाही. तोच मिरचीची आवक वाढल्याने अडीच हजार रुपयांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मजुरांचा खर्चही निघत नसल्याने इतर खर्च कसा निघेल? असा प्रश्न पडला आहे. यावर्षी वेळोवेळी औषध फवारणी करून विविध रोगांचा सामना करत कसेबसे मिरची पिकाला जगवले आहे. नुकताच माल निघायला सुरुवात झाली व भावात मोठी घसरण झाल्याने हिरवी मिरची मातीमोल भावाने नाईलाजाने विकावी लागत आहे. पुढे जर असाच भाव राहिला तर मिरची पिकामुळे शेतकरी कर्जबाजारी होईल.
-धर्मा दत्तू धनगर, शेतकरी