नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेले नवापुरात गेल्या १५ वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा बर्ड फ्लू ही पक्ष्यांवरील संसर्गजन्य साथ पसरली आहे. या साथीमुळे नवापूर व परिसरातील १० लाख कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या साथीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
नवापूर येथे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण असल्याने माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी या भागात या व्यवसायाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून या भागात हा व्यवसाय माेठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र २००६ मध्ये देशात पहिल्यांदाच येथे बर्ड फ्लूची साथ आली. त्यावेळी तब्बल पाच लाख पक्ष्यांची कत्तल करण्यात आली होती. शासनाने या व्यावसायिकांना २० कोटींची मदत दिली होती. त्या आजारातून सावरण्यास या व्यवसायाला दाेन वर्षे लागली होती. मात्र पुन्हा नव्याने हा व्यवसाय उभारीस आला. तेव्हापेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या कमी झाली. पण कोंबड्यांची संख्या मात्र २००६ च्या तुलनेत आता दुप्पट झाली आहे. पण पुन्हा गेल्या १० ते १२ दिवसांपासून येथील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचे अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्या वेळी व्यावसायिक व प्रशासनाने प्राथमिक स्तरावर राणीखेत हा आजार असल्याचा अनुमान काढला होता. पण अचानक होणाऱ्या कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. चार पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, हे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एच ५ एन ८ हा बर्ड फ्लूचा संसर्गजन्य आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे तातडीने उपाययोजना सुरू झाल्या असून, संसर्ग केंद्रापासून एक किलोमीटर त्रिज्येचे क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून व १० किलोमीटरचे त्रिज्येचे क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच पोल्ट्रीमधील पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी ९५ पथकांची नियुक्ती केली आहे. पहिल्या दिवशी अर्थात रविवारी ४० हजार पक्ष्यांची कत्तल करण्यात आली. सोमवारपासून ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली असून, एकूण २७ पोल्ट्रीमधील १० लाख पक्ष्यांची कत्तल करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनासह विभागस्तरावरील प्रशासनही येथे दाखल झाले आहे. पशुसंवर्धन आयुक्तांसह महसूल आयुक्तांनीही येथे भेट दिली असून, उपाययोजनांवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जात आहे.
या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर शासकीय सर्वेक्षणानुसार या नुकसानीचा अंदाज ३० कोटीपर्यंत आहे. त्यासंदर्भात सूक्ष्म सर्वेक्षणही सुरू आहे. या परिसरात फेरफटका मारल्यानंतर या आजाराचे हरियाणा कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. एका पोल्ट्री व्यावसायिकाने हरियाणात अतिशय स्वस्तदरात पक्षी मिळाल्याने डिसेंबरमध्ये २० हजार पक्षी आणले होते. मात्र हे पक्षी आजारी असल्याने बहुतांश पक्षी रस्त्यावरच मृत झाले होते. या पक्ष्यांमुळेच बर्ड फ्लूचा आजार या भागात आल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
बर्ड फ्लूबाबत २००६ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज झाले असून, पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. - डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार