ग्रामीण जीवनातील मातीची घरे गावोगावी आजही दिसून येतात. आरसीसी घरांच्या जमान्यातही हीच मातीची घरे ग्रामीण जीवनाची साक्ष देतात. सध्या ग्रामीण भागातील मातीच्या घरांना धाब्यावर पावसाळ्यात पाणी गळू नये, म्हणून प्लास्टिकचा कागद टाकण्याचे काम चालू आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात धाब्यावर कागदाऐवजी चिकट माती (खारी) टाकली जायची. मात्र, यामुळे दरवर्षी चिकट मातीमुळे धाब्यावर वजन वाढायचे. म्हणून कालानुरूप चिकट माती बंद होऊन बऱ्याच वर्षांपासून ग्रामीण भागात पावसाळ्याचे पाणी गळू नये म्हणून प्लास्टिकचा कागद पूर्ण धाब्यवर टाकला जात आहे.
तसेच दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे धाब्यावर असलेली मातीची वंडीदेखील खराब होते. यांचीदेखील मातीने डागडुजी करायचे काम ग्रामीण भागात सगळ्या मातीच्या घरांवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात अनेक घरे अशी आहेत, की दरवर्षी दोन - तीन चौकडींची माती लाकडांसहीत काढावी लागते. जुने लाकूड चांगले असेल तर जुने लाकूड मेस्त्रीकडून व्यवस्थित करून अथवा नवे लाकूड आणून ते लाकूड धाब्यावर व्यवस्थित ठेवून त्याच्यावर नवीन मातीचा पेन (गाऱ्याचा जाड थर) टाकला जातो. अशा घरांची अनेक ठिकाणी परिस्थिती असून, अनेक कुटुंब जुनी माती व लाकडे काढून पुन्हा त्याच्यावरून नवीन लाकडे ठेवून गाऱ्याचा जाड थर धाब्यावर टाकीत आहेत.
जयनगर येथे अनेक कुटुंबांनी आपल्या धाब्यावर प्लास्टिकचा कागद टाकून मातीची वंडी दुरुस्ती केली आहे. येथील जगदीश हरी पाटील यांनी तर आपल्या दहा चौकडीच्या घरातील चार चौकडीची धाब्यावरची पूर्ण माती आणि लाकडे काढून नवी पेन (गाऱ्याचा जाड थर) टाकला आहे. अनेक कुटुंबांनी मातीच्या घराची पत्र्याची मावठी नवे पत्रे आणून बसविण्याचे काम चालू केले आहे.
माझे घर खूपच जुने वडिलोपार्जित असून, पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गळत असते. अनेक वर्षांपासून शेतीतही चांगले उत्पन्न व भाव मिळत नसल्यामुळे नवे घर बांधण्याऐवजी मातीच्याच घराची डागडुजी करावी लागत आहे.
जगदीश हरी पाटील, जयनगर, ता. शहादा.