तळोदा : महसूल प्रशासनाच्या डिजिटल स्वाक्षरीअभावी येथील महा ई-सेवा केंद्रांमध्ये साधारण ५०० उत्पन्नाचे दाखले पडून आहेत. यामुळे नागरिकांना विविध योजना व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून स्वाक्षरीचा मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनी विविध योजना व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या शासनाच्या महा ई-सेवा केंद्राकडे उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव दाखल करून अनेक दिवस झाले आहेत. तथापि अजूनही नागरिकांना उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महसूल प्रशासनाच्या डिजिटल स्वाक्षरी अभावी दाखले देता येत नसल्याचे नागरिकांना सांगण्यात येते. इकडे कामासाठी नागरिक सुविधा केंद्रांमध्ये रोज फिरफिर करीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील भाडे खर्चून सेवा केंद्रांमध्ये यावे लागत आहे. परंतु त्यांना निराश होऊन परत जावे लागत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली.
याबाबत महसूल प्रशासनास विचारले असता डिजिटल स्वाक्षरीची एका वर्षाची मुदत संपलेली आहे. नवीन स्वाक्षरीच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव दिला आहे. अजून ती प्रमाणित झालेली नाही. लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र इकडे उत्पन्नाच्या दाखल्याअभावी नागरिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अतिशय नाके नऊ आले आहे. कारण या दाखल्यांमुळे रहिवासी दाखल्याबरोबरच इतर कागदपत्रेदेखील पूर्ण करता येत नाही.
सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. याशिवाय दहावी, बारावीचे निकालसुध्दा पुढच्या महिन्याच्या शेवटी लागणार आहेत. साहजिकच आपल्या मुला-मुलींच्या पुढील वर्षाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी पालकांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. नेमके उत्पन्नाच्या महत्त्वाचा दाखला काढता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. वरिष्ठ प्रशासनाने अडकलेला डिजिटल स्वाक्षरीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आहे.
दाखल्यांसाठी सुविधा केंद्रांमध्ये होतेय गर्दी
येथील महसूल प्रशासनाने नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्याकरिता शहरात आठ ते दहा सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सर्वच केंद्रावर दाखल्यांसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. तथापि लवकर दाखले मिळत नसल्याचे नागरिकांच्या आरोप आहे. वास्तविक जेव्हा नागरिकांना टोकन दिले जाते. त्या तारखेला संबंधित दाखला मिळत नाही. दाखल्यावर सही झाली नाही. उद्या या पर्वा या अशी वायदे दिले जातात. त्यामुळे याबाबतही संचालकांना प्रशासनाने सक्त ताकीद देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या विविध दाखल्यांवरील डिजिटल स्वाक्षरीची एका वर्षाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे नूतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. लवकरच मिळणार आहे. त्यामुळे दाखलेदेखील लगेच देण्यात येतील.
- गिरीष वाखारे, तहसीलदार, तळोदा
पाल्यांचा शैक्षणिक कामासाठी उत्पन्नाच्या दाखल्यांचे प्रकरण महासेवा केंद्रात दाखल केले आहे. परंतु अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरीचे कारण सांगण्यात आले आहे. सारखे केंद्रात चकरा मारत आहे. तरीही मिळत नाही. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना अडचणी निर्माण झाली आहे. प्रशासनाने यातून मार्ग काढावा.
- सुनील मगरे, नागरिक, तळोदा