लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर येथे पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. बर्ड फ्लू नसला तरी त्या अनुषंगानेच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. १३ पथके येथे तळ ठोकून आहेत. सद्या कुक्कुट पक्षी मरण्याचे जे प्रमाण आहे ते एकूण संख्येच्या तुलनेत फारसे जास्त नाही. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. तरीही आवश्यक ती सर्व खबरदारी जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॅा.के.टी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
नवापुरात कुक्कुट पक्षी मरण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे, ही धोक्याची बाब आहे का?
नवापुरात एकूण २८ पोल्ट्री फार्ममध्ये तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक कुक्कुटपक्षी आहेत. त्यामुळे विविध कारणांनी दररोज एवढे पक्षी मरण्याचे प्रमाण हे त्या तुलनेत सामान्य आहे. परंतु सद्या बर्ड फ्लूची चर्चा असल्याने त्याकडे लक्ष वेधले गेले. गेल्या तीन आठवड्यापासून पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू केल्या आहेत. नमुने तपासणीसाठी पुणे व भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत.
सध्या नवापुरात काय उपाययोजना सुरू केल्या आहेत?
नवापुरात पशुसंवर्धन विभागाचे १३ पथके तळ ठोकून आहेत. आपण स्वत: व इतर वरिष्ठ अधिकारी येथेच थांबून आहोत. १३ पथकांमध्ये प्रत्येकी पथकात एक पशुधन अधिकारी, एक सहायक किंवा पर्यवेक्षक अधिकारी व दोन ते तीन वर्ग चारचे कर्मचारी यांचा समावेश आहे. पथकांकडून दररोज सकाळ व सायंकाळी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला जात आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. आणखी पथके वाढविणार आहोत.
अतिरिक्त पथकांसाठी मागणी...
प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून अतिरिक्त पथकांची मागणी केली आहे. त्यांनी ते देण्याचे मान्य केले आहे. मनुष्यबळ उपलब्ध होताच उपाययोजनांना आणखी गती येणार आहे. प्रादेशिक आयुक्त यांनी नवापुरात भेट देऊन उपाययोजनांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
इतर ठिकाणीही उपाययोजना
नवापूर व्यतिरिक्त जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात १७५ पोल्ट्री फार्म आहेत. त्यात जवळपास १४ लाखापेक्षा अधिक कुक्कुटपक्षी आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना केल्या गेल्या आहेत.
परराज्यातून येऊ नये...
जिल्हा गुजरात व मध्य प्रदेश सीमेलगत असल्यामुळे जिल्ह्यात बाहेरील कुक्कुट किंवा इतर पक्षी येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना केल्या गेल्या आहेत.