लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या काळात मुदत संपणा-या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घोषित झाल्या आहेत. यांतर्गत १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर त्या-त्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व असलेले आणि वर्चस्व मिळवू पाहणारे असे सर्वच सज्ज झाले आहेत. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवला जाणार का, यावर खलबते सुरू झाली आहेत. राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सूत्र नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूकीत केवळ सत्तास्थापनेसाठी वापरले गेले होते. घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतही या सूत्राची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतू गाव तेथे पुढारी अधिक, अशी गत असल्याने महाविकास आघाडीचा झेंडा ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये फडकणार किंवा कसे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांचा बालेकिल्ला असलेल्या ग्रामपंचायती किती असाही प्रश्न आहे. तिन्ही पक्षांच्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी काही काळापूर्वी पक्ष बदल केला असल्याने पूर्वाश्रमीचे बालेकिल्ले कधीच इतिहासजमा झाले आहेत. यातून ग्रामीण भागात प्रचार कोणत्या पक्षाचा करावा असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना भेडसावणार असल्याने नेत्यांना पुढे येवून महाविकास आघाडीबाबत बोलावे लागणार आहे.
स्थानिक संस्थांमधील सरमिसळ त्रासदायक नंदुरबार जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या जोडीला एका पदावर भाजप आहे. सरमिसळ असलेल्या या राजकारणामुळे ग्रामीण भागात विकासाच्या नावाने मते मागणार कसे असाही प्रश्न आहे. ग्रामपंचायत निवडणूका ह्या बाहेरुन निरपेक्ष असल्या तरी आतून त्या पक्षीय असल्याने नेत्यांची कसरत होईल.
शिवसेना व काँग्रेसमध्येच होणार निर्णायक लढाईधडगाव, नंदुरबार हे दोन तालुके शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांना समोरासमोर आणण्याची शक्यता आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायती ह्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असल्याने शिवसेना त्यावर आतापासून हक्क सांगत आहे. दुसरीकडे धडगाव तालुक्यात काकर्दा व इरत ग्रामपंचायतींवर काँग्रेस व शिवसेना दोघांमध्येच लढत आहे.
तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्र लढण्याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याकडून स्पष्टीकरण अथवा संकेतही देण्यात आलेले नाहीत. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर निवडणूकीसाठी तयार असलेले इच्छुक नेत्यांकडे चकरा मारत असले तरी त्यांच्याकडून नेत्यांनी आघाडीचा पर्याय दिलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली ग्रामपंचायत निवडणूका होण्याची शक्यता धूसर आहे.
लढल्यास काय परिणाम?महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूका लढवल्यास यशाचे गणित बदलणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक पक्षाचे त्या-त्या तालुक्यात वर्चस्व आहे. यातून तिघांनी आपल्या बलस्थानांवर एकमेकांना मदत करुन निवडणूक लढवल्यास जास्तीत जास्त ग्रामपंचायती त्यांच्या हाती येणार आहेत.