जिल्ह्यात कृषी, फॅब्रिकेशन, टीन उद्योग, सोयाबीन ऑईल उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योगांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. या ठिकाणी जवळपास ४० हजारांहून अधिक कामगार कर्तव्यावर आहेत. परंतु, नोंदणीकृत कामगारांची संख्या साडेतीन ते चार हजार एवढीच आहे. सध्या कर्तव्यावर असलेल्या कामगारांपैकी बहुतांश कामगार गावी परतण्याच्या मार्गावर आहेत; तर बांधकाम, हॉटेल व्यवसाय बंद असल्याने या क्षेत्रांत काम करणारे जवळपास २५ हजारांहून अधिक कामगार अडचणीत सापडलेले आहेत. त्यात अनेकांनी पर्यायी कामांचा शोध घेतला आहे. अनेकजण कोविड केअर सेंटरमध्ये अथवा भाजीपाला, इतर साहित्यविक्रीचे काम करीत आहेत.
हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?
वर्षभरापूर्वी कोरोनामुळे अचानक गावी जाण्याची वेळ आमच्यावर आली होती. मालकाने पुन्हा उद्योग सुरू झाल्याने बोलावले. परंतु, कोरोना वाढत असताना लाॅकडाऊनची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
- राजूसिंह परमार, सिडको.
एमआयडीसीमधील एका कारखान्यात काम करतो. परंतु, अर्धा पगार दिला जात आहे. त्यात कारखानाही बंद असल्याने सावकाराने पुढील महिन्यापासून पगार मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभरात काही सुधारणा झाली नाही, त्यामुळे आगामी काळात काय होणार? त्यापेक्षा गावी जाऊन जीव वाचवलेला बरा.
- प्रकाश जाधव, सिंधूनगर.
लॉकडाऊन लागणार आहे. गतवर्षी अचानक लॉकडाऊन लागल्याने गावाकडे जाण्यासाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला. यावेळी सर्व सामान घेऊन गावी जाणार आहोत. पुन्हा शहराकडे येणारच नाही. शेतात मिळेल ते काम करून जगू, परंतु या महाकाय बिमारीपासून दूर राहण्यासाठी शहर सोडलेलेच बरे. परिस्थिती सुधारेल, असे वाटत नाही.
- गजेंद्र कदम, श्रीनगर.
उद्योग ७० टक्क्यांवर आले आहेत. त्यात बँकांचे हप्ते, गावी गेलेल्यांपैकी अर्धेच कामगार कर्तव्यावर आले आहेत. त्यात मालाचा उठाव असायला हवा तेवढा नाही. अशा परिस्थितीत उद्योग कसा चालविणार? त्यातच पुन्हा लाॅकडाऊन लागणार असल्याने कामगार धास्तावले आहेत. परिस्थिती कठीण असून प्रत्येकाने आपले संरक्षण करणे गरजेचे आहे. परंतु, यामध्ये सर्वाधिक जास्त उद्योग जगताचे नुकसान होत आहे.
- राजू पारसेवार, उद्योजक.
नोंदणीकृत कामगारांची संख्या कमी असली तर प्रत्यक्षात काम करणारे कामगार, मजूर, हमाल मोठ्या संख्येने आहेत. त्यात परप्रांतीय हमाल, मजुरांचा अधिक समावेश आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येकाला आपला जीव वाचविण्याचे पडले आहे. अशा परिस्थितीत कामगारही गावाकडे जाणार हे सहाजिकच आहे. परंतु, त्यामुळे उद्योगांवर मोठा परिणाम होईल.
- हर्षद शहा, उद्योजक.
आमच्याकडे अन्नप्रक्रिया उद्योग आहे. तो सुरूच ठेवावा लागणार; परंतु कामगारांची अडचण येत आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागतो. गतवर्षी गावी गेलेल्यांपैकी अनेकजण परतले नाहीत. त्यातच पुन्हा लाॅकडाऊनच्या भीतीने अनेकजण स्थलांतरित होण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे कामगारांअभावी उद्योगास फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अजयकुमार बाहेती, उद्योजक.
गतवर्षीची आठवण
गतवर्षी अचानक लॉकडाऊन लागल्याने कामगारांना गावी परतण्यासाठी पायपीट करावी लागली होती. त्यात श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या; परंतु अनेकांना कोसाे दूर पायी चालावे लागले होते. पुन्हा लाॅकडाऊन म्हटले की चित्र डोळ्यांसमोर येत आहे.