हिमायतनगर : एका कंपनीचे ट्रॅक्टरचे हेड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २६ रोजी रात्री घडली. याप्रकरणी चालक संजय रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारींवरून अज्ञात चोरट्यांविरोधात हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
राजस्थान येथील वाहन चालक हे महाराष्ट्रात सोयाबीन काढणीच्या मशिन घेऊन हिमायतनगर तालुक्यात दाखल झाले होते. सोयाबीनची कामे आटोपून ते गावी निघून गेले. त्यांचे ट्रॅक्टर येथील जवळच्या व्यक्तीला बटावाच्या पद्धतीने वाहने चालविण्यास देऊन गेले होते. निळ्या रंगाच्या एका कंपनीचे ट्रॅक्टर हेड हिमायतनगर शहरातील प्रताप गल्लीतील रहिवासी असलेले चालक संजय रामचंद्र शिंदे यांच्याकडे बटावाने चालविण्यासाठी देऊन गेले होते. वाहन ठेवण्यास घरी जागा नसल्याने त्यांनी सदरचे वाहन हे जवळील शेतकरी रामराव मादसवार शेत सर्वे नं. ३ मध्ये सागवानच्या बागेजवळ उभे केले होते. त्याचबरोबर वाहनात डिझेल व बॅटरी नसल्याने कोणीही वाहन हलविणार नाही या भरवशावर ते होते.
मात्र, २६ रोजी रात्री थंडीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी आदर्श इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे असलेल्या शेतातील सागवानाच्या बागेजवळ उभे केलेले १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर चालू करून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. ट्रॅक्टर जागेवर नसल्याचे आढळून आले. ही माहिती समजताच बटावाने ट्रॅक्टर चालविण्यास घेतलेले चालक संजय रामचंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.