बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद कार्यालयामधून पाच सदस्यीय नॅक पिअर टीम गुरुवारी विद्यापीठामध्ये दाखल झाली. या समितीचे चेअरमन सिक्कीम राज्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. गोपाल कुमार निराऊला चेस्ट्री हे आहेत. त्यांच्या समवेत समिती समन्वयक गोवा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. गौरीश नाईक, ग्वालीयर येथील माजी प्रो. डॉ. लक्ष्मीनारायण सरकार, तामिळनाडूतील अण्णामलाई विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रो. डॉ. शील्ला बुटची नागेश्वरराव आणि पंजाबी विद्यापीठाचे प्रो. डॉ. गुलशन बंसल यांचा समावेश आहे.
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रथम नॅक पिअर टीमचे स्वागत करून विद्यापीठाबाबतची माहिती सादर केली. समितीद्वारे अधिष्ठाता, अभ्यासमंडळ आणि विभाग प्रमुख यांच्यासमवेत बैठका घेऊन विद्यापीठाच्या अनेक पैलूंवर चर्चा झाली. विद्यापीठ परिसरातील परीक्षा विभाग, इंक्युबॅशन सेंटर, कोविड-लॅब, मीडिया स्टुडिओ येथील परिसरातील विभागांना त्यांनी भेटी दिल्या. तसेच शिक्षक, संशोधक विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. दिवसाच्या शेवटी नॅक पिअर समितीसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारांतर्गत लावणी, वासुदेव, दिंडी, गोंधळ, शेतकरी, तांडव नृत्य इत्यादीद्वारे महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविले. ९ व १० एप्रिल रोजी नॅक पिअर टीम विद्यापीठातील उर्वरित विभागांना भेटी देणार आहे. तसेच लातूर येथील उपपरिसरालाही भेट देणार आहे.