नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींच्या सभापदीपदांचे आरक्षण सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये काढण्यात आले़ १५ सप्टेंबर २०१४ पासून सुरू होणाऱ्या पुढील कालावधीसाठी हे आरक्षण लागू राहणार आहे़ जिल्ह्यातील निम्म्या पंचायत समितीच्या सभापतीपदी महिलाराज येणार आहे़सोडत पद्धती आणि चक्रानुक्रमे पद्धतीने ही आरक्षण सोडत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली़ या आरक्षण सोडतीत ८ पंचायत समितींचे सभापतीपद महिलांसाठी राहणार आहेत़ जिल्ह्यातील ७ पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़ तर अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमातीसाठी २ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ४ पंचायत समितींचे सभापतीपद सुटले आहे़ नांदेड पंचायत समितीसह बिलोलीचे सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे़ तर मुखेड पं़स़चे सभापतीपद अनुसूचित जाती महिलेसाठी सुटले आहे़ धर्माबाद अनुसूचित जातीसाठी तर हिमायतनगर अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव राहील़ मुदखेड आणि देगलूर पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलेसाठी तर उमरी आणि माहूरचे सभापतीपद नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राहणार आहे़ कंधार, हदगाव आणि लोहा पंचायत समितीचे सभापतीपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़ तर नायगाव, किनवट, अर्धापूर आणि भोकर पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राहणार आहे़ या आरक्षण सोडतीनंतर पंचायत समिती स्तरावरील हालचालींना वेग येणार आहे़ सदर आरक्षण सोडत दोन शालेय मुलांच्या हस्ते काढण्यात आली़ यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, तहसीलदार अरूणा संगेवार, संतोषी देवकुळे, जि़प़ सदस्य गंगाधर तोटलोड यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते़या सोडतीत नांदेड पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे़ नांदेड पं़स़त काँग्रेसचे चंद्रकांत बुक्तरे हे एकमेव सदस्य आहेत़ (प्रतिनिधी)
पं़स़सभापतींचे आरक्षण जाहीर
By admin | Updated: July 22, 2014 00:18 IST