कृषी दुकानांची तपासणी
देगलूर - तालुका कृषी पथकाकडून हणेगाव येथील कृषी केंद्र दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी खते, बियाणे याचा साठा किती आहे, मालाची विक्री योग्य दराने होते की नाही, आदी बाबी तपासण्यात आल्या. तपासणी प्रमुख म्हणून तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र टोणे, पंचायत समिती कृषी अधिकारी इडळे, कृषी सहायक धनासुरे, व्यापारी अजय पडकंठवार, बालाजी पोकरवार, रमेश राणे, शहाजी बिरादार आदी उपस्थित होते.
अवैध दारू दुकानावर छापा
माहूर - शहरातील कोलामपुरा भागातील एका दुकानातून अवैध दारू विक्री सुरू होती. पोलिसांच्या पथकाने दुकानावर छापा टाकून १ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुकानाची झाडाझडती घेत असताना यातील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश नागरगोजे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
अडीच लाखाची दारू नष्ट
लोहा - सोनखेड पोलीस स्टेशनअंतर्गत २००८ ते २०२१ या कालावधीत जप्त केलेल्या २ लाख ६१ हजार ५७१ रुपयाचा दारूचा साठा न्यायालयाच्या आदेशावरून नष्ट करण्यात आला. यामध्ये देशी दारूच्या ४ हजार २८७, बीअर ३१०, विदेशी दारूच्या २५१ बॉटल दारू होती. सोनखेड पोलिसांनी न्यायालयाकडे दारू नष्ट करण्याबाबत विनंती केली होती.
घाट बंद करण्याची मागणी
बिलोली - तालुक्यातील मौजे हुनगुंदा व मौजे कारला येथील वाळूघाटातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. हे घाट तातडीने बंद करावेत, अशी मागणी इंडियन पँथर सेनेने केली. निवेदन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गॅस दरवाढीविरोधात निदर्शने
बिलोली - गॅस, खते, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात बिलोली तहसील कार्यालयासमोर देगलूर-बिलोली विकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. निमंत्रक कॉ. सदाशिव भुयारे, प्रा. इरवंत सूर्यकर, अशोक घायाळे, कॉ. रणजित बाऱ्हाळीकर, अंबादास भंडारे, कॉ. देवीदास इंगळे, प्रा. संजय वाघमारे, कॉ. नितीन गादेकर, कॉ. शंकर जेठे, गोपाळ वाघमारे, कॉ. रंगनाथ भालेराव, नामदेव जाधव, आकाश साखरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
माळावर सीसी रस्ता
मुदखेड - येथून जवळच असलेल्या खंडोबा मंदिराला जाण्यासाठी रस्ता नव्हता. हा रोड करण्यासाठी नगरसेवक लक्ष्मणराव देवदे यांनी पाठपुरावा केला. सध्या सीसी सिमेंट रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. मागील २० वर्षांपासून या रस्त्याची मागणी होत होती. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या मागणीची दखल घेऊन रस्त्याला मंजुरी दिली.
वनीकरणाची झाडे जाळली
लोहा - लोहा-पालम रोडवर सुनेगाव तलावाच्या भागात सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड केली होती. ही झाडे दोन वर्षे तरली. मात्र अज्ञात व्यक्तीने ही झाडे जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. वनविभागाने यासंदर्भात पोलीस कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
किनवट तालुक्यात तीन वर्षात ३६ शेतकऱ्यांची आत्महत्या
किनवट - सततची नापिकी, दुष्काळ स्थिती, वाढती महागाई, कर्जबाजारीपणा आदी कारणामुळे किनवट तालुक्यात गेल्या तीन वर्षात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३३ पात्र व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाची मदत मिळाली असून, दोन शेतकरी अपात्र तर एका शेतकऱ्याचे प्रकरण चौकशीवर आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून आत्महत्येचे प्रकार थांबण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पॅकेज दिले जात आहे. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आत्महत्या थांबतील असे वाटत असताना आत्महत्येचे सत्र काही थांबले नाही.
२०१८ मध्ये १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील ११ जण शासकीय अनुदानास पात्र ठरले. दोन व्यक्ती अपात्र ठरले आहेत. २०१९ मध्ये नऊ जणांनी जीवन संपविले. हे सर्वजण सरकारी मदतीसाठी पात्र ठरले असून, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. २०२० मध्ये पुन्हा नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ते सर्वही सरकारी निकषास पात्र ठरले. जानेवारी २०२१ ते आतापर्यंत पाच शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यातील पाथरी गावातील एक महिला शेतकरी आहे. यापैकी चौघे अनुदानास पात्र ठरले असून, फेब्रुवारीत आत्महत्या केलेल्या आंदबोरी (चि.) येथील शेतकऱ्याचे प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित आहे.
बैल चोरटे जेरबंद
हिमायतनगर - येथील शेतकरी शेख अन्सार शेख रफीक यांच्या शेतातील बैलजोडी चोरणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केले. सदर बैलजोडी राजवाडी येथील पुलाजवळ असल्याची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शेख महबुब शेख जिलानी यांनी बैलजोडी जप्त करून हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणली. आरोप शेख सत्तार शेख अमीर (रा. हिमायतनगर), राजेश कामलवाड (रा. हिमायतनगर), शेख रहमान शेख मोईन (रा. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
गरजूंना रेशन किटचे वाटप
मुक्रमाबाद - येथील युवा मनेरवारलू ग्रुपच्या वतीने गरजूंना मास्क व रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी शासनाच्या नियमाचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन आंबटवाड मॅडम, विठ्ठल पावडे, ॲड. ओम तोटावाड, सुभाष पडलवार आदींनी केले.