नांदेड : कोरोनामुळे अनेकांचे उद्योग बसले, तर लाखोजणांचे रोजगार गेले. शहरात घरकाम करणाऱ्या महिलांना कामाला कोणीही लावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर अनेकांनी घरकाम न करताही अर्धा पगार दिला. परंतु, परिस्थिती अवाक्याबाहेर जात असल्याने अनेकांनी मोलकरणींना दरवाजे बंद करून कामावरून काढूनही टाकले.
नांदेड शहरात जवळपास तीन हजारांहून अधिक महिला घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई आदी कामे करतात. त्याव्यतिरिक्त स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या वेगळी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेकांनी घरात येणाऱ्या मोलकरणींचे काम बंद केले आहे. त्यांच्याकडून संसर्ग होऊ नये, या भीतीने प्रत्येकजण काळजी म्हणून घरातील कर्मचारी, मजूर, कामगार काढून टाकत आहेत. यापूर्वी जबाबदारी म्हणून कामावर नसतानाही लाॅकडाऊन काळात अनेकांनी नोकरांना तसेच मोलकरणींना पगार दिला. परंतु, आजची परिस्थिती बदललेली असून, प्रत्येकावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे बहुतांश जणांनी घरकामावरून काढून टाकून पगारही बंद केला आहे. त्यामुळे अनेक मोलकरणींच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
घर कसे चालवायचे, याचीच चिंता
मोलकरीण महिला चार ते पाच घरांतील कामे करून महिन्याला पाच ते सात हजार रुपये कमावतात. त्यातून त्यांच्या कुटुंबास मोठी मदत होते. परंतु, कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले. त्यात नवऱ्याच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत घरखर्च कसा चालवणार, अशी चिंता अनेक महिलांना लागली आहे. शासनाने नोंदणीकृत मोलकरणींना काही तरी मदत करायला हवी.
- डॉ. कॉ. उज्ज्वला पडलवार, नांदेड.
एका घरातून पाचशे ते हजार रुपये
घरातील सदस्य संख्या आणि घरातील खोल्या यावर मोलकरणींचे काम अवलंबून असते. त्यात धुणी-भांडी वेगळे आणि साफसफाईचे काम केले जाते. काही ठिकाणी पाचशे - पाचशे असे हजार रुपये तर, काही ठिकाणी एकाच कामाचे पाचशे ते सातशे रुपये मिळतात.
पाच ताेेंडांचे पोट कसे भरणार
घरामध्ये माझ्यासह चार लेकरं आहेत. पतीचे दारूमुळे वर्षभरापूर्वी निधन झाले. आज हातचे काम गेले. त्यामुळे कुटुंब कसे चालविणार, असा प्रश्न आहे. - कमला गायकवाड.
घरातील धुणी-भांडी आणि हॉस्टेलवर स्वयंपाकाचे काम करत होते. परंतु, वर्षभरापूर्वी हॉस्टेलचे काम बंद झाले. त्यानंतर मागील महिन्यापासून घरकामेही बंद झाली. त्यामुळे कुटुंब कसे सांभाळणार. - अनिता मोरे, नांदेड.
मागील वर्षभरापासून विविध अडचणींचा सामना करताना नवीन कपडे खरेदी, सण-उत्सवांना ब्रेक दिला आहे. परंतु, हा कोरोना संपतच नसल्याने किती दिवस घरी बसून खाणार आणि काय खाणार, असा प्रश्न पडला आहे. - रेखा अडळकर