- विशाल सोनटक्के
नांदेड : कोरोना प्रादुर्भावाविरुध्दची ही लढाई सोपी नाही. थेट जीवावर बेतणारी, होत्याचं नव्हतं करणारी आहे. मात्र त्यानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर समाजाच्या सुरक्षिततेसाठी अगदी जीव तळहातावर ठेवून हा लढा मोठ्या धीराने लढत आहेत.
नांदेड जिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या मसरत सिद्धीकी या महिला डॉक्टरने या लढ्यात आपल्या वडिलांसह तीन काकांना गमाविले आहे. तर विष्णुपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरच्या प्रभारी डॉ. शितल राठोड यांनी जिथे हजारो रुग्णांना कोरोनामुक्त केले तेथेच सख्या मावशीचा मृत्यू होताना पाहिले. मात्र मृत्यूचे हे तांडव पाहिल्यानंतरही सुखदु:ख बाजूला ठेवून आज त्या हजारोंचा जीव वाचावा यासाठी कोविड सेंटरमध्ये धाडसाने कर्तव्य बजावत आहेत. समोर दिसणाऱ्या शत्रूबरोबर युध्द लढणे एक वेळ सोपे असते. परंतु डोळ्याला न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म व्हायरसविरुध्दची लढाई महाकठीण. मात्र, कोरोनाला पराभूत करायचेच ही इच्छाशक्ती बाळगून कोरोनायोद्धे गत वर्षभरापासून ही झुंज देत आहेत. अशा वेळी दमछाक होते.
डॉ. सिद्धीकी या नांदेड जिल्हा रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. घर आणि नौकरी अशी तारेवरची कसरत सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबाला एका बेसावध क्षणी कोरोनाने गाठले. अख्खे कुटुंब बाधित आले. ७७ वर्षीय वडील पंधरा दिवस आयसीयूमध्ये होते. मात्र, गुंतागुंत वाढत गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ओमानमध्ये सेफ्टी ईजिनीअर असलेला सख्खा भाऊही निर्बंधामुळे या कठीण काळात घरी पोहोचू शकला नाही. त्यानंतर प्रत्येकी तीन दिवसांच्या फरकाने तीन काकांचेही या आजाराने निधन झाले. याचदरम्यान तिकडे औरंगाबादेत भावजींचाही कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त धडकले. या अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे गेल्यानंतरही आज डॉ. मसरत हे आभाळाएवढे दु:ख बाजूला ठेवून हजारोंना जीवदान मिळवून देण्यासाठी कोविड सेंटरमध्ये प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या धम्मदीपा कांबळे यांचाही संघर्ष असाच डोळ्यात पाणी आणणारा आहे. २०१७ पासून महामंडळात कार्यरत असलेल्या धम्मदीपा यांचे वडील वामनराव (वय ६२) यांना कोरोनाची बाधा झाली. सुरुवातीला नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना हैदराबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तेथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुमारे दहा लाखावर खर्च करूनही त्या वडिलांना वाचवू शकल्या नाहीत. घरची परिस्थती नाजूक त्यामुळे अशा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागल्यानंतरही अत्यावश्यक सेवा म्हणून त्या महामंडळाच्या सेवेत वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या सात दिवसात रुजू झाल्या. डॉ. मसरत, डॉ. शितल राठोड अथवा धम्मदीपा कांबळे यांनी धीर सोडलेला नाही. ‘वक्त तू कितना भी परेशान कर ले, लेकीन याद रखना, किसी मोड पे तुझे भी बदल देंगे हम’ या निर्धारानेच त्या आजही लढताना दिसतात.
डॉ. राठोड यांनी मावशीला तर पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी वहिनीला गमाविलेनांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अशोक घोरबांड फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोनाविरुध्दचा लढा लढत आहेत. मागील महिन्यात पत्नीसह त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्याच वेळी वहिनीलाही कोरोनाची बाधा झाली. घोरबांड दाम्पत्यांनी कोरोनावर मात केली, मात्र ६० वर्षीय वहिनीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजवर ५०४ पोलीस कर्मचारी बाधित आले असून, सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. याच्या झळा त्यांच्या कुटुंबीयांनाही सोसाव्या लागल्या आहेत. विष्णुपुरी येथील डॉ. शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरच्या प्रभारी डॉ. शितल राठोड यांनी हजारों रुग्णांना जीवदान दिले आहे. मात्र त्यांनाही सख्या मावशीचा सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू पाहण्याची वेळ आली.