कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचा धोका पुढे आला आहे. कोरोनानंतर रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ज्यांना कोरोना झाला नाही, अशांनाही हा रोग होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वेळेवर उपचार घेतल्यास हा रोग बरा होऊ शकतो. नागरिकांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे पाळावे, तसेच गर्दीत जाणे टाळावे. त्याचवेळी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोना नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे.
ही घ्या काळजी...
म्युकरमायकोसिस हा अतिजलद पसरणारा रोग आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना हा रोग होऊ शकतो. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवावे, कान, नाक, घसा, नेत्र व दंतरोग तज्ज्ञांकडून आठवड्यानंतर तपासणी करावी, दिवसातून दोनदा मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात, मास्क वारंवार बदलावा, वैयक्तिक, तसेच परिसराची स्वच्छता ठेवावी.
ही आहेत लक्षणे...
म्युकरमायकोसिस जबडा, डोळे, नाक आणि मेंदू यांना बाधित करतो. चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधीरपणा येणे, डोक्याची एक बाजू दुखणे, नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, डोळा दुखणे, नाकातून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव, अस्पष्ट दिसणे, दात दुखणे, ताप येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद राहणे अशीही म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत.
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. वेळेवर उपचार लाभल्यास हा रोग बरा होऊ शकतो. वैयक्तिक तसेच परिसराची स्वच्छताही महत्त्वाची आहे. गर्दीत जाणे टाळावे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. उपचारादरम्यान स्टेराईड किंवा इतर औषधी जास्त प्रमाणात शरीरात गेल्यामुळे म्युकरमायकोसिस होऊ शकतो.
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड.