नागपूर : मुलांची विक्री करणाऱ्या महिला आपले गर्भाशयही भाड्याने देतात. डॉक्टरांच्या माध्यमातून त्या इच्छुक दाम्पत्यांना गाठतात. ठरवलेल्या लाखो रुपयांच्या रकमेतून आपले गर्भाशय भाड्याने देतात. या अवैध व्यवसायातून पैसा कमाविण्यासोबतच मानवी देहाच्या तस्करीचे रॅकेट चालविले जात आहे. या व्यवसायात विक्री करण्यासाठी बालिका उपलब्ध करून देणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला असून बालिकेच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यावर या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या गुन्हे शाखेने मुलांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. यात सहभागी असलेल्या शर्मिला विजय खाकसे (५०, भंडार मोहल्ला, इंदोरा), शैला विनोद मंचलवार (३२, बिरसा नगर, दिघोरी, खरबी), लक्ष्मी अमर राणे (३८, सुभाष नगर), मनोरमा आनंद ढवळे (४५, बारसे नगर, पांचपावली), पूजा सुरेंद्र पटले (४०, साईबाबा नगर) आणि तिचा पती सुरेंद्र यादव पटले (४४)यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून चार वर्षाची बालिका मुक्त करण्यात आली आहे. आरोपींनी पोलिसांच्या बनावट ग्राहकाशी अडीच लाख रुपयात या बालिकेचा सौदा केला होता. रक्कम घेऊन बालिका सोपविताना पोलिसांनी रंगेहात अटक केली. पोलिसांच्या मते, या महिला अनेक दिवसांपासून या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. गर्भाशय भाड्याने देण्यातून दोन ते तीन वर्षातून कमाई होते. काही डॉक्टर एकीऐवजी अन्य महिलांचा वापर यासाठी करत असल्याने या आरोपी महिलांना नियमित कमाई होत नव्हती.
मुले नसणाऱ्या दाम्पत्यांसाठी सरोगसी प्रक्रिया हे वरदान आहे. असे जोडपे डॉक्टरांकडे संपर्क साधतात. डॉक्टर उत्तम आरोग्य असणाऱ्या महिलांची निवड यासाठी करतात. गर्भधारणेपासून तर बाळाचा जन्म होईपर्यंतचा सर्व खर्च इच्छुक जोडपे करतात. गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलेला सरोगसी मदर म्हणतात. या बदल्यात संबंधित महिलेला लाखो रुपये दिले जातात.
आरोपी महिला अनेक दिवसांपासून हा व्यवसाय करायच्या. बाळ दत्तक घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेतील जटीलतेची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे एकाच सौद्यातून मोठी रक्कम मिळविण्याच्या लालसेतून हे आरोपी मुलांच्या विक्रीचे रॅकेट चालवायला लागले. या घटनेत सापडलेली चार वर्षांची बालिका मध्य प्रदेशातील सिहोर येथील आहे. जय नायडू या दलालाच्या माध्यमातून बालिकेला त्यांच्याकडे सोपविले होते. तो पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्या माध्यमातून बालिकेच्या कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे.
मुलांची मागणी अधिक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींपेक्षा मुलांची मागणी अधिक असते. मुलाच्या विक्रीतून साडेतीन लाख तर मुलीच्या विक्रीतून अडीच लाख रुपयात सौदा ठरतो. मुली सहज मिळतात, मात्र ग्राहकांना मुलगा हवा असतो. आरोपी महिला अत्यंत चलाख असून खरी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
...