हिंगणा : तालुक्यातील वानाडाेंगरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना निलंबित करण्यात आल्याने या पालिकेतील मुख्याधिकारी पद १२ दिवसांपासून रिक्त आहे. शहरातील विविध कामे प्रभावित हाेत असल्याने येथे तातडीने नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना एका प्रकरणात दाेषी ठरवीत निलंबित करण्याचे आदेेश राज्य शासनाच्या अप्पर सचिवांनी दिल्याने त्यांना या पदावरून कमी करण्यात आले. त्यांच्या जागी नवीन मुख्याधिकारी नियुक्त करणे अपेक्षित हाेते. मात्र, १२ दिवसांपासून येथे नवीन मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही किंवा प्रभारी मुख्याधिकारीही नियुक्त केला नाही. त्यामुळे पालिकांतर्गत काम करणाऱ्या राेजंदारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन रखडले असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील पाईपलाईन दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची कामे प्रभावित झाल्याने शहरात अनियमित पाणीपुरवठा हाेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेत असल्याने या समस्या साेडविण्यासाठी तातडीने मुख्याधिाकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे केली आहे.