आशु सक्सेना यांनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाबाबत बोलताना लोकमतच्या मोहिमेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अजनीच्या इंटर माॅडेल स्टेशनसाठी पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे. खापरी, बुटीबाेरी, गाेधनी किंवा कामठी स्टेशनवरही त्याचा विकास हाेऊ शकतो आणि या भागात झाले तर शहरात येणारी गर्दी विभाजित हाेईल. उलट अजनी येथे माॅडेल स्टेशन झाल्यास गर्दी कमी हाेण्याऐवजी वाढेल. परिणाम पाहिल्यानंतर पुन्हा नवीन याेजना आखावी लागेल. त्यामुळे भविष्याचा विचार करून आताच नियाेजन गरजेचे आहे, असे मत सक्सेना यांनी व्यक्त केले. तसेही नागपूर रेल्वे स्टेशन, गणेशपेठ बसस्थानक, माेरभवन, अजनी स्टेशन व मेट्राे स्टेशनही फार दूर नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाने लाभ मिळेलच, याचा भरवसा देता येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे नागपूर शहरालगत १० किमीचे क्षेत्र मेट्राे रिजनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भविष्यात ते वाढून २५ किलाेमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास कार्य करायचे आहे, सिमेंट राेड बनवायचे आहेत किंवा इंटर माॅडेल स्टेशन तयार करायचे आहे तर या नवीन क्षेत्राचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे जुने इन्फ्रास्ट्रक्चर शाबूत राहील आणि नवीन पर्यायही उपलब्ध हाेतील.
त्यांनी सांगितले, शहराच्या इतिहासाकडे लक्ष दिल्यास नागपूरचे संस्थापक बख्त बुलंदशाहपासून राजे रघुजी भाेसले आणि इंग्रजांनीही रिक्त जागेवर विकास कामे केली आणि जुन्या स्ट्रक्चरला नष्ट केले नाही. त्यामुळे आताच्या प्रशासनानेही जुने इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यावरणाला नुकसान न हाेऊ देता विकास कामे करायला हवी, जे अधिक याेग्य ठरेल. त्यानुसार याेजना आखल्या पाहिजे. नागरिकांच्या टॅक्सचे पैसे असे वारेमाप खर्च करण्यात अर्थ नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वर्तमान काळात रुग्णालयाची गरज
आशु सक्सेना म्हणाल्या, काेराेनासारख्या महामारीचा धाेका लक्षात घेता वर्तमान काळात इंटर माॅडेल स्टेशनपेक्षा रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. कारण शहराचा विस्तार झाला असला तरी रुग्णालयाची संख्या वाढली नाही. मेडिकल व मेयाेवर अधिक ताण पडत आहे. त्यामुळे कामठी, बुटीबाेरी, खापरी आणि गाेधनी परिसरात रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. महापालिकेनेही नवीन रुग्णालय व प्राथमिक आराेग्य केंद्राची संख्या वाढविणे आवश्यक आहे. मात्र हे सर्व करताना पर्यावरणाला हानी पाेहचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.