कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : शेतकऱ्यांकडील धानाला चांगला भाव मिळावा म्हणून राज्य शासनाने रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. ही सर्व केंद्र नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या धानाचे पूर्णपणे माेजमाप न करता ३१ मार्च राेजी बंद करण्यात आली. त्यामुळे या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान विकायचा कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा धान व्यापाऱ्यांना विकाला तर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १,२०० ते १,३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.
या दाेन्ही शासकीय संस्थांनी त्यांचे धान खरेदी केंद्र उशिरा म्हणजेच डिसेंबरमध्येे सुरू केले. मध्यंतरी केंद्रांवरील धानाच्या पाेत्यांची उचल करण्यात न आल्याने ते केंद्र किमान महिनाभर बंद हाेते. ते पुढे फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आले. त्यातच या केंद्रावरील धानाच्या माेजमापाचा वेगही खूप संथ हाेता. या केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार नाेंदणीही केली हाेती. धान माेजणीसाठी आपला नंबर लागेल या प्रतीक्षेत असताना शासनाने धान खरेदी केंद्र बंद केले आणि शेतकरी अडचणीत सापडले.
सध्या ग्रामीण भागात काेराेनाचे संक्रमण वाढत असून, भीतीपाेटी नागरिक काेराेना टेस्ट करायला तयार नाहीत. रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जागा नाही आणि खासगी डाॅक्टरांकडे उपचार करण्यास पैसा नाही. त्यातच घरात धान विक्रीविना पडून आहेत, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर खूप त्रास झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या केंद्रावर धानाच्या पाेत्यांची उचल न केल्याने नवीन पाेती ठेवायला जागा नाही, असे सांगून महिनाभर खान खरेदी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शासनाने धान खरेदीला किमान महिनाभराची मुदतवाढ द्यायला हवी हाेती, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. या केंद्रांवर धानाचे माेजमाप मुद्दाम संथगतीने करण्यात आले, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.
...
आठवड्यातील तीन दिवस माेजमाप
बंद केलेली काही धान खरेदी केंद्रं जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये १८ दिवसांनी सुरू करण्यात आली. बांद्रा व टुयापार येथील धान खरेदी केंद्र आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीला दिले हाेते. या साेसायटीच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक झाली नसल्याने सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती केली हाेती. त्यांना एक नव्हे दाेन खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी या दाेन्ही केंद्रांवर आठवड्यातील तीन दिवस धानाचे माेजमाप केले आणि चार दिवस केंद्र बंद ठेवले हाेते. या बाबी शासनाने ग्राह्य धरायला पाहिजे.
...
दरवर्षी गुदामे फुल्ल
रामटेक तालुक्यात सहा ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले हाेते. यातील बेर्डेपारवगळता सर्वच केंद्रांच्या गुदामांची क्षमता कमी आहे. या गुदाम क्षमतेबाबत सर्वांनाच इत्थंभूत माहिती असून, दरवर्षी गुदाम फुल्ल असल्याचे कारण सांगून खरेदी केंद्र बंद केले जाते. मात्र, गुदामांची क्षमता वाढविणे किंवा पर्यायी व्यवस्था केली जात नाही. या केंद्रांवर धानाचे माेजमाप करताना घाेळ केला जाताे. मर्जीतील शेतकऱ्यांची एकाचवेळी नाेंदणी व धानाचे माेजमाप करण्यात आल्याचे तसेच आधी नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील धानाचे अद्याप माेजमाप न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बहुतांश केंद्रांवर व्यापाऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाते. मात्र, या गंभीर प्रकाराकडे कुणीही लक्ष देत नाही.