सौरभ ढोरे
काटोल : काटोल नगर परिषदेच्या नगर रचना विभागातील रचनाकार दिनेश गायकवाड, सहायक रचनाकार विपीन भांदकर या दोन कर्मचाऱ्यांना शनिवारी लाचलुचपत विभागाच्या चमूने लाच स्वीकारताना अटक केली. या कारवाईमुळे काटोल शहरात नानाविध चर्चांना उधाण आले आहे.
पालिका कार्यालयात हा प्रकार काही नवीन नसून या अगोदरही हे प्रकार रोजरोस सुरू असल्याचे बोलले जात आहे. याचमुळे न.प.च्या सेवेत रुजू होऊन अवघे दोन वर्ष झालेल्या या कर्मचाऱ्यांचे धाडस लाच मागण्यासाठी वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिकेतील या लाचखोरांवर आता तरी लोकप्रतिनिधी अंकुश लागवणार का, असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. काटोल शहरात मिळणाऱ्या भौतिक सुविधांचा विचारात घेत ग्रामीण भागातील नागरिकांचा येथे स्थायिक होण्याकडे गत दशकभरापासून कल वाढला आहे. गत दहा वर्षात काटोलचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. शहराचा चारही बाजूने विस्तार होत आहे. नवीन लेआउट आखले जात आहे. यासोबतच भूखंड खरेदी-विक्रीमध्ये पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणत हेराफेरी केल्या जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
काटोल शहरात ले-आउट आखताना ले-आउट मालकांकडून ले-आउटचे नगर रचना विभागाच्या नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट चार्ज पालिकेत जमा करणे बांधकारक असते. गत २० वर्षात काटोल शहरात अनेक ले-आउट आखण्यात आले.
२०१२ मध्ये काटोल पालिकेच्या वतीने ले-आउट आखताना ले-आउट डेव्हलप करण्यातकरिता ले-आउट मालकाला बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार जोवर हे ले-आउट नियमानुसार डेव्हलप केल्या जात नाही तोवर त्यातील काही प्लॉट हे गहाण करण्यात येईल असा ठराव पारित करण्यात आला. याच ठरावाचा फायदा घेत हे गहाण भूखंड रिलीज करण्याकरिता लागणारे कागदपत्रे व मोक्का पडताळणी करण्याची जबाबदारी नगर रचना विभागाकडे आली. त्यांच्या माध्यमातूनच हे भूखंड रिलीज होत असल्याचा फायदा हे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी घेऊ लागले. यातून शहरातील अनेक ले-आउट मालकांना गंडविल्या जात आहे. यामुळे ना ले-आउट योग्यरित्या डेव्हलप केल्या जात ना याची पाहणी केली जात. यातूनच हेराफेरीने जन्म घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालिकेच्या नगररचना विभागातील हा गोरखधंद्याची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.
गुंठेवारी प्रकरणात अडकले
असतानासुद्धा मागितली लाच
गहाण प्लॉट रिलीज करण्याकरिता १.२५ लाखांची मागणी करणारे नगर रचनाकार गायकवाड व सहायक रचनाकार भांददकर दोघांवरही काटोल पोलिसांत अवैध गुंठेवारी प्रकरणात ४२० व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची चौकशी सूर असतानाच या दोन्ही कर्मचा-यांनी लाच मागितली यावरून या अधिकारी व कर्मचा-यांचे कुणाचे अभय तर नाही ना?