नागपूर : जगात साधारण तीन कोटी ९० लाख अंधव्यक्ती आहेत. जवळपास एक कोटी ५० लाख केवळ भारतात आहे. यात १ लाख २० हजार लोकांना दरवर्षी बुबुळासंबंधी अंधत्व येते. मात्र सुमारे ५० हजार नेत्रदान होते. मेडिकलचा नेत्ररोग विभागाने यात पुढाकार घेत अंधत्वावर मात करण्यासाठी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’चा प्रस्ताव तयार करून अधिष्ठात्यांकडे पाठविला होता. अधिष्ठाता बदलेले मात्र तीन वर्षांपासून हा प्रस्ताव पुढेच सरकला नाही. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यात पुढाकार घेतल्यास ही ‘लॅब’ तयार होऊन एका नेत्रदानातून तीन रुग्णांमध्ये बुबूळ प्रत्यारोपण करणे शक्य होईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
अलीकडे नेत्रदानाचे प्रमाण वाढले असलेतरी नेत्रदानाबद्दलच्या समाजाच्या चुकीच्या मान्यतेमुळे मृत्यूनंतर पन्नास टक्केही नेत्रदान होत नाही. भारतात दरवर्षी ८४ लाख लोक मृत्युमुखी पडतात. मात्र यातील ४९ हजार ५१० म्हणजे ०.५८ टक्केच नेत्रदान होते. यामुळे एका नेत्रदानातून तीन रुग्णांमध्ये बुबूळ प्रत्यारोपणाची प्रक्रिया होणे आवश्यक असून यासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने तीन वर्षांपूर्वी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’चा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला. त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु प्रस्तावित जागेवर ‘दीनदयाल थाळी’ प्रकल्प उभारण्यात आल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी नव्याने प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. परंतु त्यानंतरही हा प्रस्ताव पुढे गेला नाही. सध्या कोरोनाचा काळ असल्याने २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये २५ टक्केही नेत्रदान झाले नाही. यामुळे बुबुळांच्या प्रत्यक्षात असलेल्यांची यादीत वाढ झाली आहे.
- बुबूळ प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्यासाठी ‘लॅब’ची गरज
बुबुळावर पाच स्तर असतात. यातील वरील दोन स्तर खराब झालेले असलेतरी उर्वरित तीन स्तराचा उपयोग अंधत्व दूर करण्यासाठी केला जातो. यासाठी ‘कॉर्निआ रिसर्च लेबॉरेटरीज’च्या माध्यमातून ही ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ करणे शक्य असते. संपूर्ण बुबूळ प्रत्यारोपणाच्या तुलनेत ‘लॅमीलर केरॅटोप्लास्टी’ शस्त्रक्रियेचा यशाचा दर दुप्पट असतो. या शिवाय, ‘लेबॉरेटरीज’मुळे २० दिवसांपर्यंत बुबूळ ‘फ्रीज’ करणे शक्य होईल. सोबतच पीजीच्या विद्यार्थ्यांना नवे संशोधन करण्यास वाव मिळून याचा फायदा रुग्णाला होऊ शकेल, असेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.