कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात विविध नदी - नाल्यांवर बांधण्यात आलेल्या कमी उंचीच्या पुलांवरून पावसाळ्याच्या दिवसात पाणी वाहते. अशावेळी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कळमेश्वर-लिंगा मार्गावरील सावंगी येथील पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहेत.
तालुकास्तरावरून ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावाला रस्त्यांनी जोडलेले आहे. यापैकी बरेच रस्ते मजबूत असून काही रस्त्यांचा शासनदरबारी दर्जा वाढवून रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. परंतु तालुक्यातील राज्यमार्गापासून अंतर्गत जाणाऱ्या रस्त्याकडे अद्यापही दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रत्येक खेडोपाडी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. सोबतच्या रस्त्यांवर लागणाऱ्या नदी-नाल्यांवर लाखो रुपये खर्च करून पुलांची निर्मिती करण्यात आली. परंतु सावंगीच्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून सतत पाणी वाहत असते. या रस्त्यावरून होणारी वाहतूक एक - दोन तासासाठी प्रभावित होते, तर एखाद्या नागरिकाने अशा पाण्यातून वाहन चालविण्याचा प्रयत्न केल्यास तो पुरात वाहून जाण्याची शक्यता असते.
कळमेश्वर - सावंगी (तोमर) मार्गावरील पूल पूर्णत: मोडकळीस आला असून या पुलावरून सावंगी, उपरवाही, निंबोली, गुमथळा, लोणारा, लिंगा, लाढई या गावांची वाहतूक होते. या पुलावर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
या पुलावरून ८ ते ९ गावांतील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी विविध प्रकारच्या कामांकरिता ये-जा करावी लागते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पुलाचे नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे.
- नीता तभाने, सरपंच, ग्रामपंचायत सावंगी (तोमर)