उदय अंधारे
नागपूर : हवामान बदलाचे भयकारी संकेत आता दिसायला लागले आहेत. सर्वाधिक परिणाम भविष्यात कृषी क्षेत्राला भाेगावे लागणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शेतीचे पॅटर्न प्रभावित हाेणार आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात पिकणाऱ्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता संकटात येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी’ ने भविष्यात कृषी क्षेत्रावर हाेणाऱ्या हवामान बदलाच्या परिणामांचा केलेला अभ्यास या संकटाचे संकेत देणारा आहे. तज्ज्ञांच्या मते पेरणीच्या काळात जमिनीत थाेडा ओलावा असणे गरजेचा आहे, जाे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे मिळताे. मात्र अभ्यासानुसार २०२१ ते २०५० या ३० वर्षाच्या काळात पर्जन्यमान घटणार असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा राहणार नाही आणि पेरणीवर परिणाम हाेईल. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार बियाणे पेरणीनंतर बीजांकुर निघेपर्यंत १०० दिवस हवामान थंड असणे गरजेचे आहे, ज्यामुळे पिकांच्या व उत्पादकतेच्या वाढीस मदत हाेते. मात्र भविष्यात हवामानातील पुरेसा थंडावा मिळेल, याची शास्वती राहणार नाही. पुढच्या ३० वर्षात सरासरीपेक्षा तापमानात वाढ हाेणार असल्याने झाडांचा पाेतच बिघडण्याची शक्यता आहे.
पुढच्या ३० वर्षात पिकांची पेरणी आणि दाणे भरण्याच्या काळात एकीकडे पर्जन्यमानाची कमतरता असेल तर दुसरीकडे गरजेपेक्षा अधिक पाऊस हाेईल. मात्र तापमान वाढलेले असेल. येत्या ३० वर्षात गव्हाच्या पिकाचा विचार केल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळात पावसाची गरज अधिक असताना पाऊस कमी असेल आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये कापणीच्या काळात जेव्हा पावसाची गरज नसेल तेव्हा अधिक पाऊस असेल. ज्वारीचा विचार केल्यास भविष्यात ज्वारीचा पेरणीचा काळच बदलण्याची शक्यता आहे. कारण ऐन पेरणीच्या काळात उच्च तापमान आणि अधिक पावसामुळे पिकांना फंगल राेगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र पीक वाढीच्या काळात पुन्हा तापमानात वाढ आणि पावसाच्या कमतरतेचा परिणाम हाेईल. येत्या काळात तापमानात २ ते ३ अंश वाढ हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र बहाराच्या काळात किमान तापमान आवश्यक तापमानापेक्षा कमी असेल. तापमानात हाेणारी वाढ ही दाणा भरण्याच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम करणारी असेल. शिवाय जमिनीतील ओलावा घटणार असल्याने पिकांचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. कापणीच्या काळात ढगाळ वातावरण आणि अधिक पावसाचा सामना करावा लागणार आहे.
- पिकांच्या गुणवत्तेला बसेल फटका
भविष्यात तापमान आणि पर्जन्य पॅटर्नमध्ये वारंवार हाेणाऱ्या बदलामुळे कापूस, साेयाबीन, गहू, ज्वारी या विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील पिकांच्या वाढीवर परिणाम हाेईल. साेयाबीन आणि कापसाच्या विकसित हाेण्याच्या काळात अधिक पावसामुळे उत्पादन आणि गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम हाेण्याची शक्यता आहे. गहू व ज्वारीसारख्या रब्बी पिकांच्या दाणे भरण्याच्या काळात अधिक तापमानामुळे पिकांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम हाेतील.
- विवेक अढिया, राष्ट्रीय संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल कम्युनिटी