नागपूर : वीकेंड लाॅकडाऊनच्या कडक अंमलबजावणीचा प्रभाव शनिवारी नागपुरात दिसून आला. शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयेही बंद हाेती. औषधी तसेच किराणा, भाजी, फळे, पेट्राेल पंप आदी जीवनाश्यक गाेष्टी वगळता इतर सर्व दुकाने बंद हाेती. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला हाेता. राज्य शासनाकडून लाॅकडाऊनची घाेषणा केल्यानंतर महापालिका आणि पाेलीस प्रशासनाने नागरिकांना नियम पालनासाठी कठाेर पावले उचलली आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नागपुरात शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून कडक लाॅकडाऊनला सुरुवात झाली, जी साेमवारी सकाळी ७ वाजतापर्यंत चालणार आहे. इतवारी, मस्कासाथ, मोमिनपुरा, सीताबर्डी, जरीपटका परिसरातील दुकानदारांनी लाॅकडाऊनविराेधात प्रदर्शनही केले हाेते. त्यानंतर मात्र पाेलीस प्रशासनाने सर्व क्षेत्रात मार्च काढत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठाेर कारवाईचा इशारा व्यापाऱ्यांनाही दिला. याचा परिणाम शनिवारी स्पष्ट दिसून आला. इतवारीच्या शहीद चाैकासह प्रमुख चाैकांमध्ये बॅरिकेड लावून बंदाेबस्त ठेवण्यात आला. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. काही वाहनचालकांना पोलिसांनी दंड ठोठावला. ओळखपत्र आणि कामाबाबत माहितीचे दस्तऐवज असलेल्यांना साेडण्यात येत हाेते. महाल आणि सीताबर्डी भागात शुकशुकाट पसरला हाेता. रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने येथील दुकाने तशीही बंद राहणार आहेत. मात्र फूटपाथवर माेठ्या संख्येने दुकाने लागलेली असतात, त्यामुळे पाेलिसांनी आधीपासूनच कंबर कसली आहे. संक्रमणात वाढ हाेत असल्याने मनपा प्रशासन आणि पाेलिसांचाही तणाव वाढला आहे. त्यामुळे कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उद्यानांचे गेटही बंद करण्यात आले आहेत. हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंटमधून हाेम डिलिव्हरीची सुविधा देण्यात आली आहे. माॅल्समध्ये किराणासंबंधित सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्याकडे ग्राहक भटकलेच नाही. काही बाजारपेठांमध्ये व्यापारी आपापल्या दुकानांसमोर बसून होते. काही असोसिएशननी बैठका घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.
रस्त्यावर वाहन घटले
साेमवार ते शुक्रवारपर्यंत नागपूरच्या रस्त्यावर दिसणारी नागरिकांची आणि वाहनांची गर्दी शनिवारी मात्र दिसली नाही. काहीच वाहने रस्त्यांवर दिसत होती. सायंकाळच्या वेळी वाहनांची संख्या वाढली पण सूर्यास्त हाेताच पुन्हा रस्ते ओसाड पडले.