राहुल अवसरे नागपूर घरी वडील पाणीपुरी विकायचे. प्रसंगी उत्तमलाही वडिलांना मदत करावी लागायची. व्यवसाय व अभ्यास दोन्ही सांभाळणे ही खूप मोठी तारेवरची कसरत होती. उत्तमने ती लीलया पार पाडली अन् ध्येयाच्या दिशेने सुरू झालेल्या या प्रवासाच्या दुसर्या टप्प्यात स्वत: यशाने उत्तमला आलिंगन घातले. उत्तम सुखदेव वर्मा असे या विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असून त्याने एमसीव्हीसी (इलेक्ट्रॉनिक्स) अभ्यासक्रमात इयत्ता बारावीमध्ये ७२.७६ गुण मिळविले आहेत. चांगले गुण मिळविणे हे आता कोणत्याही एका वर्गविशेषापुरते र्मयादित राहिलेले नाही. परिश्रम व संघर्षाची तयारी असलेला प्रत्येक जण आकाशाला गवसणी घालू शकतो, हे उत्तमने सिद्ध करून दाखविले आहे. उत्तम हा हडस कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आता त्याला अभियंता व्हायचे आहे. झांशी राणी चौकातील मदनगोपाल अग्रवाल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो आपल्या स्वप्नपूर्तीकडे वळला. उत्तमला इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रचंड रुची आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करताना तो भान विसरून जातो. या आवडीमुळे त्याने एमसीव्हीसीचा पर्याय निवडला. वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले. उत्तमचे वडील हॉटेल हरदेवपुढे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी २0 वर्षांपर्यंत एका खासगी हॉटेलमध्ये नोकरी केली. यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही ते उत्तमला शिक्षणासाठी काहीच कमी पडू देत नाहीत. उत्तमला याची जाणीव असून वडिलाची शिकून मोठे होण्याची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो अथक परिश्रम घेत आहे. बारावीतील गुणांची माहिती दिल्यावर वडिलाने आनंदाने आलिंगन दिल्याचे उत्तमने सांगितले. उत्तमला दोन मोठय़ा बहिणी असून एक लहान भाऊ आहे. एका बहिणीचे लग्न झाले आहे. तो रोज सुमारे सहा तास अभ्यास करीत होता.
पाणीपुरीवाल्याच्या मुलाचे पाणीदार यश
By admin | Updated: June 3, 2014 03:02 IST