टमाटरचे भाव उतरले : भाज्या महिनाभर महागचनागपूर : घाऊक बाजारातच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने किरकोळ विक्रीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजीपाला सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी महिनाभर भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील, असे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. टमाटरचे भाव सध्या उतरले आहेत. स्थानिकांकडून आवक कमीशेतकरी खरीप हंगामाकडे वळल्याने त्यांचे भाजीपाला लागवडीकडे दुर्लक्ष आहे. नागपूर जिल्ह्यात सिंचनाच्या सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीला जोडधंदा म्हणून अनेकांनी भाज्यांचे उत्पादन सुरूच ठेवले आहे. स्थानिकांकडून थोड्याच भाज्या बाजारात येत आहेत. पण नागपूर शहरात मागणी आणि पुरवठ्याच्या प्रमाणात तफावत असल्याने बाहेरगावातून आणि लगतच्या राज्यातून माल नागपुरात येतो. उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च पाहता तो माल महागच असतो. कॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरचीची आवक आहे. नागपूरलगतहून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारल्याची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. या बाजारातून अन्य ठिकाणी भाज्या विक्रीसाठी जात असल्याने सध्या भाज्यांचा तुटवडा आहे. सध्या भाज्यांना मागणी कमी असल्याचे अडतियांनी सांगितले. कांदा आटोक्यात, बटाटे महागसध्या कांद्याला मागणी कमी असल्याने भाव आटोक्यात आहेत, तर भाज्याच्या किमती वधारल्यानंतर बटाट्याला मागणी वाढली आहे. पर्यायी कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २५ रुपयांवर गेले आहेत. कळमन्यात लाल आणि पांढरा कांद्याचे सरासरी १५ ट्रक येत आहेत. आवक कमी असली तरीही भाव आटोक्यात आहेत. पांढरे आणि लाल कांदे ७०० ते ७२५ रुपये मण (४० किलो) आहेत. अमरावती आणि अकोला येथून पांढरा तर बुलडाणा येथून लाल कांद्याची आवक आहे. थोडेफार ट्रक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून येत आहेत. तसे पाहता श्रावण महिन्यात कांद्याची विक्री कमी असल्याने दरही कमी असतात. तीन आठवड्याआधी भाव १००० रुपयांवर होते. केंद्र सरकारचे निर्यातीत कांद्यावरील कठोर नियमांमुळे यावर्षी भाव स्थिर राहिले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून आलेला कांदा उत्तर भारतात विकला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाली. त्याचाही परिणाम कांद्याच्या भावावर झाल्याची माहिती कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. सध्या आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात नवीन कांदा बाजारात आला आहे. बेंगळुरु येथे रोज १५ ते २० गाड्यांची आवक आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात नवीन कांदा बाजारात येईल. भाज्या महाग झाल्याने सध्या बटाट्याच्या किमती वधारल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर, आग्रा, मेणपुरी, इटावा या जिल्ह्यातील बटाट्याची आवक आहे. सरासरी १५ ते १० ट्रक येत आहेत. श्रावणामध्ये बटाट्याला मागणी जास्त असल्याने भाव वधारल्याचे वसानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भाजीपाला बेचव, कडधान्याचा आधार
By admin | Updated: August 11, 2014 00:58 IST