खून प्रकरणातील आरोपी : नागरिक दहशतीतनागपूर : खुनाच्या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला कुख्यात वसीम ऊर्फ चिऱ्या आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध लकडगंज पोलिसांनी खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल केला आहे. अनवर ऊर्फ चांदी वहाबच्या खुनात पोलिसांना हवा असलेला वसीम घटनेला आठवडा होऊनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. वसीमला पोलिसांचा आश्रय असल्याने शांतिनगरमधील नागरिकांमध्ये दहशत पसरलेली आहे. वसीमने आपल्या साथीदाराच्या मदतीने २२ सप्टेंबर रोजी अनवरचे शांतिनगर उद्यानाजवळून अपहरण केले होते. त्याला अगोदर यशोधरानगर येथे नेण्यात आले. तिथे दारू पाजल्यानंतर कळमन्यातील पावनगावात त्याचा खून करण्यात आला. मृतदेह कामठीतील एका कालव्यात फेकून ते फरार झाले होते. सुरुवातीपासूनच पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. २७ सप्टेंबरला वसीमच्या साथीदारांनी खुनाची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच अनवरचा मृतदेह जप्त करण्यात आला. या प्रकरणात एका अल्पवयीनसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान शांतिनगर येथील मुरारी गुप्ता यांनी वसीम व त्याचा साथीदार सोनू ऊर्फ रिजवान, छोटा वसीम, निसार, गोलू, अय्याज आणि बाशीद पटेलच्या विरुद्ध खंडणी वसुलीची तक्रार केली. गुप्ताने शांतिनगर येथे अब्दुल रशीद छोटेमिया यांच्याकडून २००४ मध्ये दुकान भाड्याने घेतले होते. पगडीच्या रूपात दिलेले १ लाख ७० हजार रुपये परत करण्यावरून त्यांच्यात वाद झाला. वसीम आपल्या साथीदारासह गुप्ताच्या घरी गेला. चाकूचा धाक दाखवून दुकानाची चावी हिसकावून घेतली. तसेच पुन्हा दुकानावर गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फरार असूनही वसीम ऊर्फ चिऱ्या शांतिनगर परिसरात सर्रास फिरत असतो. तो रात्रीच्या वेळी शांतिनगर उद्यानातच राहतो. तेथूनच त्याचे अवैध धंदे चालतात. सकाळ होताच तो फरार होतो. लकडगंज पोलिसांनाही याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
वसीमविरुद्ध खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल
By admin | Updated: October 8, 2015 02:35 IST