लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. आतापर्यंत जवळपास पाच लाख लोकांना लस देण्यात आली. मर्यादित पुरवठ्यामुळे लसीकरणाला मर्यादा आली आहे. अर्थातच यामुळे मनपाच्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन व लसीकरण आपल्या दारी उपक्रमाला धक्का बसला आहे. नावासाठी मोहीम असल्याची परिस्थिती आहे. सोमवारी कोव्हिशिल्डचे १० हजार डोस मिळाल्याने लसीकरण केंद्र सुरू होते. २,५२८ लाभार्थींना डोस देण्यात आले. यात २,२३५ लाभार्थींना पहिला, तर २९३ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला. पुरेसा साठा नसल्याने लसीकरणाला गती आलेली नाही.
लसीकरणाच्या नावावर शहरातील नागरिकांची थट्टा सुरू आहे. मनपाकडे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही. परंतु नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. सोमवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लसीकरण आपल्या परिसरात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. परंतु किती लाभार्थींना लस देण्यात आली, याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली नाही. परिस्थिती विचारात घेता, मागणीनुसार साठा उपलब्ध होत नसताना मोहीम एक औपचारिकता ठरत असल्याचे चित्र आहे.
आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. शहारात २०७ केंद्र असले तरी सर्व केंद्रांवर लस दिली जात नाही. याआधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थींना डोस दिले जात होते. परंतु आता हा आकडा दोन ते तीन हजारांवर आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ४,८९,९३६ लाख लाभार्थींना पहिला डोस, तर १,६०,४५५ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंगळवारी लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.
.....
नागपूरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२३ मे )
पहिला डोस
आरोग्य सेवक - ४५,१००
फ्रंटलाइन वर्कर - ५२,५०१
१८ वयोगट - (सध्या बंद आहे)
४५ वयोगट - १,२६,३८२
४५ कोमॉर्बिड - ८१,९७१
६० सर्व नागरिक - १,७२,८४१
पहिला डोस - एकूण - ४,८९,९३६
....
दुसरा डोस
आरोग्य सेवक - २२,८४७
फ्रंटलाइन वर्कर - १८,९८०
४५ वयोगट - २८,२७५
४५ कोमॉर्बिड - १७,५४४
६० सर्व नागरिक - ७२,८०९
दुसरा डोस - एकूण - १,६०,४५५
संपूर्ण लसीकरण एकूण - ६,५०,३९१