सबसे सफल, बेटी हमारी नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याप्रमाणेच नागपूर विभागात विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांमध्ये मुलींचेच वर्चस्व दिसून आले. विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या रुंजन भेलेकर व अवंती सावजी यांनी ९६.७७ टक्के गुण मिळवीत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर वाणिज्यमध्ये शरण्या शिवरामन हिने ९५.५४ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेत एलएडी महाविद्यालयाच्या श्रीनिधी देशमुख या विद्यार्थिनीनेच ९१.६९ टक्के गुण मिळवीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. या तिन्ही शाखांमध्ये मागील वर्षीप्रमाणे मुलींचाच वरचष्मा कायम आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. नागपूर विभागातून ७२,६४४ पैकी ६६,५३३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.६६ टक्के इतकी आहे, तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणार्यांचे प्रमाण ८६.३६ टक्के इतके आहे. जर नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर २८,८३७ पैकी २६,९५६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.५७ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी चक्क २१.६४ टक्क्यांनी जास्त आहे. नागपूर जिल्ह्यातून ८९.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ९0.७७ टक्के इतका राहिला. (प्रतिनिधी)
ंबारावी निकाल : उपराजधानीत तिन्ही शाखांत विद्यार्थिनींचाच वरचष्मा
By admin | Updated: June 3, 2014 02:49 IST