लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : उपविभागाचा विस्तार मोठा आहे. उमरेड, भिवापूर आणि कुही या तीन तालुक्याच्या कार्यक्षेत्राचा समावेश उमरेड उपविभागात होतो. सध्या याठिकाणच्या दोन्ही बड्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ‘प्रभारी’ म्हणून सांभाळली जात आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. उपविभागीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी या दोन्ही पदाचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर सुरू आहे. ही दोन्ही कार्यालये आणि अधिकारी उपविभागासाठी महत्त्वपूर्ण असताना ही पदे प्रभारी ठेवण्याचे कारण काय, असा सवाल विचारला जात आहे.
तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आदींच्या कार्यालयावर नियत्रंण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय कार्यालयाचे प्रमुख म्हणून एसडीओ यांच्याकडे असते. काेर्टाचे काम, सक्षम प्राधिकारी, न्यायालयीन व दंडाधिकारी कार्य, उत्खननाची परवानगी, जाती प्रमाणपत्र जारी करणे, सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र, एनए लागू करणे व दंड वसूल करणे आदी कार्यप्रणाली अतिशय शिस्तबद्धरीत्या एसडीओ सांभाळतात. उमरेड येथे हिरामण झिरवाळ यांच्याकडे ही जबाबदारी होती. कोरोना काळात त्यांनी मौलिक कार्य पार पाडले. त्यांना मुंबई येथील विधानभवनात बढती मिळाली. १६ डिसेंबरला ते रुजूसुद्धा झाले. झिरवाळ यांच्याऐवजी तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडे एसडीओ म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.
उपविभागात कायदा व सुव्यवस्थेचे नियत्रंण व देखरेख राखण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असते. या पदावर पौर्णिमा तावरे कर्तव्यावर होत्या. त्यांचीसुद्धा ५ ऑक्टाेबर २०२० रोजी पुणे शहर पोलीस दलात बदली झाली. सुमारे तीन महिन्यापासून नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची उमरेड येथे बदली झाली असून, ते अद्याप रुजू व्हायचे असल्याचीही बाब समोर येत आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण पदाचा पूर्णवेळ कारभार कुणाकडे, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
....
उमरेडसाठी चढाओढ
उमरेड हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत ‘प्रिय’ ठिकाण आहे. शांत, संयमी नगरीत नागरिकांची कार्यप्रणालीसुद्धा अत्यंत शिस्तप्रिय असते. शिवाय, संत्रानगरी नागपूरपासून उमरेड केवळ ४५ किमी अंतरावर असल्याने विविध सेवाकार्याचा पुरेपूर लाभ याठिकाणी मिळतो. शिवाय कुरघोडीचे राजकारण बघावयास मिळत नसल्याने कार्यालय कोणतेही असो उमरेडच मिळावे, यासाठी चांगलीच चढाओढ आणि लॉबिंग नेहमीच दिसून येते.