नागपूर : काेराेनाचा फैलाव वेगाने हाेत असल्याने रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ही भीषणता ग्रामीण भागातही वाढली आहे. अशावेळी अंत्यसंस्कारासाठी लाकडांची कमतरता भासत आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागात लाकडांची तस्करी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला असून, झाडे ताेडणारी टाेळी सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात वृक्षताेड राेखणाऱ्या यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे.
पर्यावरण कार्यकर्ता श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रकार निदर्शनास आणला आहे. पूर्वी गावाकडे माेठमाेठी आंब्याची, चिंचेची झाडे दिसायची. शेतकऱ्यांच्या शेतात, रस्त्यावर ही झाडे वर्षानुवर्षे उभी असायची. आजाेबांनी कधीतरी लावलेल्या झाडांची फळे नातवंडं चाखायची; मात्र आता दिसेनाशी झाली आहेत. पैशाच्या माेहापायी ही झाडे विकली गेली, कापली गेली. रस्ते रुंदीकरणाच्या नावानेही शेकडाे झाडे कापली जात आहेत. झाडे कापणाऱ्या टाेळीची मदत घेतली जाते. हे लाेक कुणाचेही ऐकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कधी रात्री तर कधी पहाटेच्या वेळी संधी साधून वृक्षताेड सुरू आहे. शहरात झाडे कापली की, कुणीतरी दखल घेऊन तक्रार दाखल करताे. ग्रामीण भागात मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे दिसते. ही लाकडे माेठ्या प्रमाणात विकली जात आहेत. भंडारा, गाेंदिया, वर्धा, अमरावती आदी जिल्ह्यांत हा प्रकार सर्रासपणे हाेत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
बंदी असतानाही कत्तल
दरम्यान, माेठमाेठी जुनी आंब्याची, चिंचेची झाडे ताेडण्यास बंदी आणली आहे. ही झाडे कापता येत नाहीत किंवा आरा मशीनचे मालक विकतही घेऊ शकत नाहीत. यावरही आरा मशीन मालकांनी ताेडगा काढला आहे. गावातील शेतकऱ्यांच्या मालकीचे झाड ताेडण्यासाठी त्यांना पैशांचे आमिष दाखविले जाते. त्यानंतर आंबे लागत नाहीत, माकडांचा हैदाेस हाेत असल्याचे कारण पुढे करून तालुका कृषी अधिकाऱ्याकडून वृक्षताेडीची परवानगी घेतली जाते. कृषी अधिकारीही काही न पाहता परवानगी देताे. या आधारावर मग वनविभागाचीही परवानगी मिळते. मग ४ झाडांची परवानगी घेऊन १० झाडे कापली जात असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
हल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत
देशपांडे यांनी त्यांना आलेला अनुभव कथन केला. शेतीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या देशपांडे यांनी तेथे सुरू असलेली वृक्षताेड थांबविण्याचा प्रयत्न केला. कायद्याचा धाक दाखविला; मात्र त्यातील काहींनी त्यांच्यावरच हल्ला केला हाेता. कुटुंबाचे सदस्य साेबत असल्यानेच बचावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुणीही त्यांच्या वाटेला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.