लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेच्या माध्यमातून रुग्णांसाठी ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. ऑक्सिजन प्लांटही उभारला जात आहे. यासाठी आर्थिक कमतरता भासणार नाही, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली. शनिवारी इंदिरा गांधी रुग्णालय व पाचपावली सूतिकागृहाची भोयर यांनी पाहणी केली.
ऑक्सिजन बेडसची कमतरता पडू नये, यासाठी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयामध्ये, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन लाईन व काही रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची व्यवस्थाही करण्यात येत आहे. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती महेश महाजन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते.