लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या स्पेसवूड नामक फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीला मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास आग लागली. आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. कंपनीतील विविध साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेते. एमआयडीसी परिसरात प्लॉट क्रमांक टी-४६/४७/४८ मधील अंदाजे अर्धा एकर जागेवर ही कंपनी आहे. यात प्लायवूडपासून फर्निचर तयार केले जाते. कंपनीच्या कार्यालयाजवळील शेडमध्ये सायंकाळी आग लागली. सर्वत्र प्लायवूडचा भुसा व तुकडे पडलेले असल्याने ही आग कमी काळात कंपनीच्या आवारभर पसरत गेली. लगेच अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली. काही वेळातच हिंगणा एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे तीन बंब तसेच नागपूर महानगरपालिका, वाडी नगर परिषद व डिफेन्सची प्रत्येकी एक अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या.
आगीच्या ज्वाळा व धूर दुरून दिसत हाेता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू हाेते. मात्र, आग नियंत्रणात आली नव्हती. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. एमआयडीसी पाेलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेते.
...
कामगारांना सुरक्षितस्थळी हलविले
स्पेसवूड कंपनीमध्ये २०० कामगार काम करतात. आग लागताच त्या सर्वांना तातडीने कंपनीच्या आवाराबाहेर सुरक्षितस्थळी हलविले. ही आग परिसरातील कंपन्यांमध्ये पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेजारच्या कंपन्यांमधील कामगारांना बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. आग लागल्याचे लक्षात येताच ती बघण्यासाठी नागरिकांसह कामगारांनी गर्दी केली हाेती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाेलिसांना ही गर्दी तातडीने हटवावी लागली. या एमआयडीसी परिसरात नेहमीच आगीच्या घटना घडतात. त्या का घडतात, यावर कुणीही गांभीर्याने विचार केला नाही किंवा त्यावर ताेडगा काढला नाही.