नागपूर : मागील २४ तासातील बदललेल्या वातावरणामुळे विदर्भातील तापमान घटले आहे. दोन दिवसांनंतरही पावसाचे वातावरण कायमच असून नागपुरात वारेही वाहत आहेत. हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मंगळवारी नागपुरात आणि ग्रामीण भागात चांगला पाऊस पडला. मागील २४ तासामध्ये २४ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. यामुळे नागपुरातील तापमानाचा पारा बुधवारी ३५.६ अंशावर आला होता. अमरावती आणि वाशिममध्येही पारा अनुक्रमे ३५ आणि ३५.४ अंश सेल्सिअसवर होता. नागपुरात दिवसभर आकाशात ढग दाटलेले होते. दुपारनंतर काही भागात तुरळक पाऊसही पडला. आर्द्रता सकाळी ८८ टक्के, तर सायंकाळी ७५ टक्के नोंदविण्यात आली. सायंकाळनंतरही शहरात काही भागात तुरळक पाऊस पडला.
विदर्भात गोंदिया व बुलडाणा येथे ३७ अंश सेल्सिअस तापमान होते. अकोल्यात ३७.१, गडचिरोली ३७.६, यवतमाळ ३८.७, वर्धा ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेल्या २४ तासात नागपूरसह अन्य जिल्ह्यातही वादळी पावसाचे वातावरण होते. अकोलामध्ये १२,८ मि.मी. पाऊस पडला. अमरावतीत ३.४ मि.मी., तर वर्धा येथे ४.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. वादळाने अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या तुटून पडल्या.