कोरोनामुळे ज्या ऑनलाईन एज्युकेशनची नवीन संकल्पना पुढे आली, हे एज्युकेशन विकसित देशांमध्ये सुरू आहे. पण कोरोनाने भारतात ऑनलाईन एज्युकेशनचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे घराघरात शिक्षण पोहोचविले, हा शिक्षण क्षेत्रात आलेला मोठा बदल आहे. जे मोबाईल, गॅजेट्स, लॅपटॉप आपण मनोरंजनासाठी वापरायचो, त्याला शिक्षणाशी जोडले गेले. विशेष म्हणजे शिक्षक चॉक अॅण्ड बोर्ड पर्यंत मर्यादित होते, ते अध्यापनाच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत आले आहेत. ज्या शिक्षकांना आयटी क्षेत्रात कमजोर समजले जायचे, त्यांनी स्वत:ला अपडेट केले. मुळात ग्लोबल एज्युकेशन कोरोनामुळे लोकल झाले.
दीप्ती बिस्ट, शिक्षिका
- जो शिक्षक वर्गात शिकवीत होता तो जगाला शिकवीत आहे
कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि शाळा बंद झाल्या. सरकारने ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिले. हे ऑनलाईन शिक्षण किती कल्पकतेने मांडता येईल, याचा विचार शिक्षकांनी केला, स्वत:ची शैली विकसित केली, त्यातून अभ्यासाचे व्हिडिओ तयार केले, ते यूट्यूब, फेसबुक पेजवर टाकले. ते व्हिडिओ केवळ त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी बघितले नाहीत, तर लाखो विद्यार्थी त्याला बघू लागले. वर्धा येथील नितीन कराळे या शिक्षकाने हे पटवून दिले.
अनुपमा हर्षल, शिक्षण सल्लागार
- पालकांची चिंता कमी झाली
ऑनलाईनमुळे घराघरात शिक्षण पोहोचले. पालकांना मुले डोळ्यासमोर दिसू लागली, त्यांना मुलांच्या बाबतीत असलेली काळजी दूर झाली, शाळेची फी, स्कूल बसचा खर्च, पुस्तके, गणवेशाचा खर्च याचा भुर्दंड पालकांना यंदा बसला नाही. शाळा घरी आल्याने मुलांचा ट्युशन, शाळेत जाणारा वेळ वाचला, दप्तराचे ओझे कमी झाले, मुलांना आऊटडोर गेम खेळायला वेळ मिळाला. टीव्हीवरील कार्टून, मोबाईलवरील गेम खेळणारी मुले मैदानी खेळात रंगली. शारीरिकदृष्ट्या विकसित झाली. विशेष म्हणजे घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या बाबतीत पालकांची जी चिंता होती ती नाहीशी झाली.
- शुभांगी साठे, पालक