नागपूर : प्रवाशांची तपासणी करीत असताना एका प्रवाशाला तिकीट मागितल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने टीसीला मारहाण करून रक्तबंबाळ केले. ही घटना शनिवारी वर्धा ते नागपूर रेल्वेस्थानकादरम्यान घडली.
रेल्वेगाडी क्रमांक ०१५२६ चेन्नई-हजरत निजामुद्दीन स्पेशलमध्ये टीसी समशेरसिंग सुखविंदरसिंग कुशवाह (५५) रा. लक्ष्मीनगर वर्धा हे नागपूर ते वर्धादरम्यान कर्तव्य बजावत होते. या गाडीच्या डी १ कोचमध्ये ते प्रवाशांची तपासणी करीत होते. दरम्यान, त्यांनी या कोचमधील प्रवासी नीलेश कल्लू कुशवाह (१९) रा. विदिशा, मध्य प्रदेश यास तिकीट विचारले. तिकीट नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी या प्रवाशाला आधारकार्ड मागितले. परंतु त्याने आधारकार्डही दिले नाही. त्यामुळे त्यांनी दंड भरण्यास सांगितले. त्यामुळे संबंधित प्रवासी संतप्त झाला. त्याने टीसीला मारहाण केली. यात टीसीच्या नाकातून रक्त बाहेर आले. नागपूर रेल्वेस्थानक येताच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी भादंविच्या कलम ३२५, ३५३, १८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक विजय तायवाडे करीत आहेत.
............