विधानसभेचे माजी उपाध्यक्ष : आज अंत्यसंस्कारनागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. सूर्यकांत जागोबाजी डोंगरे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी ११.३० वाजता वैशालीनगर निर्वाणघाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अॅड. सूर्यकांत डोंगरे यांचा जन्म १० मार्च १९३६ रोजी नागपुरातील काचीपुरा (इतवारी) येथे झाला.अॅड. हरिदास आवळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते आंबेडकरी चळवळीत कार्य करू लागले. विद्यार्थीदशेपासूनच विविध आंदोलनात ते सक्रिय राहिले. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. आचार्य अत्रे यांनी सुरू केलेल्या दैनिक मराठा वृत्तपत्राचे संपादनही केले. त्यांनी समाज प्रबोधनार्थ ‘रिपब्लिकन आंदोलन’ व ‘रिपब्लिकन विचार’ या दोन पत्रिकांचे संपादन केले. उत्तर नागपूर विधानसभेचे ते सलग दोन टर्म आमदार होते.७ एप्रिल १९७९ रोजी ते विधानसभेचे उपसभापती म्हणून अविरोध निवडून आले. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातूनच २० जानेवारी १९८५ रोजी एकीकरण झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ लागली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष वसंत पुरके, मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष सी.एस. थूल यांनी दूरध्वनीवरून डोंंगरे कुटुंबीयांचे सांत्वन करीत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. रोजगार हमी योजना आणि जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद खांडेकर, विश्व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते हरिदास टेंभुर्णे, इंजिनियर विजय चिकाटे, ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे, काँग्रेसचे माजी शहाराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, विनीता तिरपुडे, सेवानिवृत्त न्यायाधीश एस.डी. सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या प्लॉट क्र. ८ गुरुनानकपुरा डॉ. आंबेडकर मार्ग येथील निवासस्थानाहून निघेल. डॉ. आंबेडकर मार्गे एस.सी.एस.गर्ल्स एज्युकेशन संस्था वैशालीनगर मार्गे, वैशाली निर्वाण घाट येथे पोहोचेल. तिथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाईल.(प्रतिनिधी)
सूर्यकांत डोंगरे यांचे निधन
By admin | Updated: July 19, 2014 02:26 IST